चेन्नई, दि. 10 - क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी स्मिथ आणि विराटच्या वादाने क्रिकेटजगत ढवळून निघाले होते. पण यावेळी स्मिथने सावध पवित्रा घेतली आहे. विराट नक्कीच शानदार खेळाडू आहे. त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड अप्रतिम आहे. त्याला शांत ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, तर भारत दौ-यात आम्ही यश मिळवू शकतो,’ अशी प्रतिक्रीयाऑस्टेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिली.
ऑस्ट्रेलियन संघ नुकताच बांगलादेश दौ-याहून भारत दौ-यावर आला आहे. चेन्नई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मिथने आगामी एकदिवसीय मालिकेबाबत प्रतिक्रीया दिली. या मालिकेत कोहलीला लवकर बाद करावे लागेल, असे सांगताना स्मिथ म्हणाला की, ‘कोहली आणि माझ्या कामगिरीतील अंतराने मी चिंतीत नाही. पण नक्कीच तो एक शानदार खेळाडू आहे. त्याला शांत ठेवणे आमच्यासाठी फायदेशीर ठरणार असून यामुळे आम्ही या दौ-यात यश मिळवू शकतो.’
याआधी यावर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौ-यावर आला होता. या मालिकेतील बंगळुरु सामना वादामुळे चांगलाच गाजला होता. त्या सामन्यात स्मिथने डीआरएस निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहत मदत मागितली होती. यानंतर कोहलीने स्मिथवर जाहीर टीकाही केली होती.
या प्रसंगाविषयी विचारल्यानंतर स्मिथ म्हणाला की, ‘मला वाटते की एकदिवसीय मालिका खिलाडूवृत्तीने नक्कीच खेळली जाईल. भारताविरुद्ध खेळणं कठीण असते. मागच्या एकदिवसीय दौ-याबाबत म्हणाल, तर मी २०१३ च्या दौ-यात नव्हतो. सपाट खेळपट्ट्यांवर मोठ्या धावसंख्या उभारले गेले होते. त्यामुळे या मालिकेत काय होणार याची उत्सुकता लागली आहे.’
भारताने या मालिकेत रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन स्टार फिरकी गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. मात्र, तरीही यजमानांचे फिरकी आक्रमण योग्य असल्याचे स्मिथने म्हटले. त्याने सांगितले की, ‘ही मालिका कसोटीच्या तुलनेत अत्यंत वेगळी आहे. अक्षर पटेलने भारतासाठी खूप चांगले काम केले आहे. युझवेंद्र चहल व कुलदीप यादवही खूप चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे नक्कीच चांगले फिरकी गोलंदाज आहेत आणि मालिकेत आम्हाला त्यांचा चांगल्याप्रकारे सामना करावा लागेल.’
मागच्या काही काळापासून आमचे फलंदाज फिरकी गोलंदाजी चांगल्याप्रकारे खेळू लागले आहेत. नक्कीच कसोटीमध्ये आम्ही अजून शिकत आहोत आणि यात सुधारणा आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. खेळपट्टीबाबत अनभिज्ञ असल्याने आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि परिस्थितीनुसार खेळात बदल करावा लागेल असेही स्टीव्ह स्मिथ म्हणाला.
स्टिव स्मिथ आणिविराटचा वाद -मागच्या वर्षी स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी बंगळुरुच्या दुसऱ्या कसोटीत स्मिथ पायचीत झाला होता. यावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू घेण्याची संधी स्मिथकडे होती. मात्र यावेळी स्मिथने ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकाऱ्यांकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीने याला आक्षेप घेतला. यावेळी मैदानात आणि मैदानाबाहेर कोहली आणि स्मिथ यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं होतं.