मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतून भारतीय संघाचे उपांत्य फेरीतच पॅक अप झाले. न्यूझीलंडकडून टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टीकाकारांच्या चर्चेचा विषय ठरला. 2011मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीला यंदा फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. संथ खेळामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही ( बीसीसीआय) धोनीच्या सेंड ऑफच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच धोनीशी या संदर्भात चर्चा करणार आहेत. धोनीनं स्वतःहून निवृत्तीचा निर्णय न घेतल्यास, त्याला पुढे संघातून कधी खेळायला मिळेल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे असा प्रसंग उभा राहण्यापूर्वीच प्रसाद हे धोनीशी चर्चा करणार आहेत. तसेही 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीत धोनीच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत निवड समितीकडून मिळत आहेत. त्यामुळे त्याला सन्मानपुर्वक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारायला हवी. ''
सूत्रांनी सांगितले की,'' रिषभ पंतसारखा युवा यष्टिरक्षक संधीची प्रतीक्षा करत आहे. धोनी हा पहिल्यासारखा फिनिशर राहिलेला नाही. 6 व्या आणि 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो संघर्ष करताना दिसत आहे. हीच गोष्ट संघाला नुकसान पोहोचवत आहे.''
बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार? विश्वचषक स्पर्धेत झालेला पराभव, त्यानंतर समोर आलेल्या संघातील गटबाजीच्या बातम्या या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयनं पुढील स्पर्धेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. भारतीय संघात विराट आणि रोहित असे दोन गट असल्याचं वृत्त गेल्याच आठवड्यात समोर आलं. त्यानंतर आता मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार बीसीसीआयकडून गांभीर्यानं सुरू आहे.
संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळणारा भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. यानंतर आता बीसीसीआयकडून संघाचा कर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्यानं आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना तसे स्पष्ट संकेत दिले. 'चांगले संघ एक स्पर्धा संपल्यावर लगेचच पुढच्या स्पर्धेची तयारी करू लागतात. इंग्लंडनं जिंकलेला विश्वचषक हे त्याचंच उदाहरण आहे. त्यामुळेच पुढील स्पर्धेकडे लक्ष केंद्रीत करुन भारत तयारीला लागेल. त्यासाठी रोहितकडे कर्णधारपद दिलं जाऊ शकतं. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो संघाचं नेतृत्व करु शकतो. तर कोहलीकडे कसोटी संघाची धुरा कायम ठेवली जाऊ शकते,' असं पदाधिकाऱ्यानं सांगितलं.