chennai super kings team | नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार (MS Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर सीएसकेची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्व क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक माजी खेळाडूंनी धोनी यंदा आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याचे म्हटले आहे. सीएसकेचा माजी खेळाडू केदार जाधवने (Kedar Jadhav) देखील या वृत्ताला दुजारा देत धोनी आयपीएलमधून निवृत्त होईल असा दावा केला होता. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज वसिम अक्रमने सीएसकेच्या भवितव्याबद्दल एक भाकीत केले आहे.
दरम्यान, धोनीनंतर चेन्नईच्या संघाची धुरा रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली जाईल अशी चाहत्यांना आशा आहे. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे शानदार कामगिरी करत आहे. ३४ वर्षीय रहाणेने त्याच्या कारकिर्दीत १२३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. पण यंदाच्या हंगामात त्याने १८९.८३च्या स्ट्राईक रेटने धावा करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. रहाणेने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये दोन अर्धशतकी खेळींच्या जोरावर २२४ धावा केल्या आहेत.
जडेजा नसून मराठमोळा खेळाडू सांभाळेल धुरास्पोर्ट्सकीडाशी बोलताना अक्रमने म्हटले, "जर धोनीने आयपीएल २०२३ नंतर आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तर चेन्नईला अजिंक्य रहाणेपेक्षा चांगला कर्णधार मिळणार नाही. सीएसकेने आयपीएल २०२२ मध्ये रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून आजमावले होते. पण कालांतराने त्यांना कर्णधार बदलावा लागला. त्यामुळे मला वाटते की, अजिंक्य रहाणेपेक्षा चांगला कर्णधार मिळणार नाही. तो एक स्थानिक क्रिकेटर असून मला कल्पना आहे की स्थानिक क्रिकेटर फ्रँचायझी क्रिकेटमध्ये यशस्वी होतात."
काही काळ भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे देखील कर्णधारपद सांभाळले आहे. रहाणेने त्याच्या नेतृत्वात २५ पैकी १६ सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आगामी काळात रहाणे चेन्नईचा कर्णधार असेल का हे पाहण्याजोगे असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"