लीड्स - इंग्लंडविरूद्घच्या तिस-या आणि अखेरच्या वन डे सामन्यातील पराभवानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंपायरकडून चेंडू मागितल्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. बुधवारचा संपूर्ण दिवस सुरू असलेली ही चर्चा वेगाने वाढत असल्याचे दिसताच प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भाष्य करावे लागले. धोनीच्या निवृत्तीच्या अफवांना त्यांनी पूर्णविराम लावला. अशी चर्चा होणे निराशाजक असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरूण यांना चेंडूची अवस्था दाखवण्यासाठी धोनीने तो घेतला होता. त्या चेंडूची अवस्था कशी होती आणि त्यावर संघाला कसे खेळायला हवे होते, याची कल्पना त्यांना द्यायची होती, असे शास्त्रींनी सांगितले. त्याशिवाय त्यांनी या सगळ्या वायफळ चर्चा असून धोनी कुठेही जात नसल्याचे स्पष्ट केले.
निर्णायक सामन्यात इंग्लंडने भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि 2-1 अशा फरकाने मालिका खिशात घातली. मालिका पराभवानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग पकडला. हा सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ फिरू लागला, त्यात धोनीने अंपायरसोबत चर्चा करून चेंडू घेताना दिसत होता.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यापूर्वीच असेच काहीसे केले होते. धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाविरूद्धची लढत अनिर्णीत राहिली होती आणि त्या सामन्यानंतर धोनी स्टम्प घेऊन गेला होता. त्यात इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर तो चेंडू घेऊन गेल्याने निवृत्तीच्या चर्चा रंगल्या.
Web Title: If not for retirement, Dhoni took ball for this reason!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.