भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारतीय संघात अनेकदा चांगल्या खेळाडूंना संधी का मिळत नाही. तसेच काही खेळाडूंना कसं झुकतं माप दिलं जातं, याबाबतची माहिती चेतन शर्मा यांच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे.
झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना चेतन शर्मा यांनी दिलेल्या उत्तरामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडीमध्ये खेळाडूंना कसं झुकतं माप दिलं जातं. कुठल्याही खेळाडून फिट असतानाही कसं बाहेर बसवलं जातं. तर कुणाला अनफिट असतानाही कशी संधी दिली जाते, हे या स्टिंगमधून उघड झालं आहे. हार्दिक पांड्या भेटायला येतो. रोहित शर्मा अर्ध्या अर्ध्या तासापर्यंत फोनवर बोलतो.उमेश यादव आणि दीपक हुड्डासारखे खेळाडू वारंवार भेटायला येतात, ही गोष्ट चेतन शर्मांनी कॅमेऱ्यासमोर कबूल केली आहे.
या गोष्टी अगदीच सर्वसामान्य वाटतील. मात्र भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता असण्यापेक्षा निवड समितीच्या अध्यक्षांशी सेटिंग असणं अधिक आवश्यक आहे. निवड समितीच्या प्रमुखांशी तुमचे कसे संबंध आहेत ही बाब महत्त्वाची ठरते. जर तुमचे संबंघ चांगले असतील, तुमचं त्यांच्या घरी येणं जाणं असेल, अर्धा अर्धा तास बोलणं होतं असेल. गोपनीय गोष्टींची देवाण घेवाण होत असेल, तर भारतीय संघात तुमचं स्थान पक्कं असेल.
क्रिकेटपटूंना त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर संघात स्थान मिळावं, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा असते. मात्र चेतन शर्मांना कॅमेऱ्यासमोर जे कबूल केलं त्यामुळे खेळाडूंचं भवितव्य हे निवड समितीच्या प्रमुखांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतं, असं दिसत आहे. जर खेळाडू निवड समिती अध्यक्षांच्या आवडीचा असला तर त्याची कामगिरी कशीही असली तरी तो खेळत राहील. तर मात्र जर खेळाडू निवड समिती अध्यक्षांना आवडत नसला तर त्याने कितीही चांगली कामगिरी केली तरी त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकत नाही.