मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकवण्यास भारतीय सैन्याने सुरुवात केली आहे. भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर सर्जिकल स्ट्राईक करताना दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. त्याला पाकिस्तानकडून आज प्रत्युत्तर मिळाले. दोन देशांतील या तणावजन्य परिस्थितीत क्रिकेटपटूनीही उडी घेतली आहे. एकीकडे भारतीय क्रिकेटपटू देशाच्या जवानांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे पाकचे खेळाडू भारताला जशास तसे उत्तर देण्याची वार्ता करताना दिसत आहेत. रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनेही अशाच पोकळ धमक्या दिल्या आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले. बुधवारी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे.
पण, भारताची दोन विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया आणि लष्कराकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेनेच्या कोसळलेल्या विमानांचे फोटो आणि एक व्हिडीओही पाकिस्ताननं व्हायरल केले आहेत. तसेच पाकिस्ताननं एका वैमानिकाला अटक केल्याचाही कांगावा केला असून, त्यासंदर्भातील एक व्हिडीओही व्हायरल केला. परंतु तो व्हिडीओ खरा आहे की खोटा हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
भारत-पाक यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता पाकचा माजी गोलंदाज अख्तरने उडी घेतली आहे. तो म्हणाला,''आम्हाला युद्ध नको, असे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख गेले काही दिवस सातत्याने भारताला सांगत आहेत. तसेच अनेकदा चर्चेची मागणी करूनही भारताकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. जर ते आम्हाला आव्हान देत असतील, तर आम्हीही सज्ज आहोत. आम्हीही त्यांना युद्धाच्या मैदानावर बघून घेऊ.''