Join us  

पाकिस्तान-न्यूझीलंडचे गुण आणि नेट रनरेटही सारखा राहिला तर सेमीफायनल कोण खेळणार? असा आहे नियम

ICC CWC 2023: पाकिस्तान आणि न्यूझीलंडपैकी एका संघाला उपांत्य फेरीतील चौथा संघ बनण्याची अधिक संधी आहे. मात्र दोघांचेही समान गुण आणि समान नेट रनरेट राहिल्यास कोण पुढे जाणार याबाबतची माहिती समोर आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 1:15 PM

Open in App

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरी आता शेवटच्या टप्प्याकडे पोहोचली आहे. स्पर्धेत आतापर्यंत ३८ सामने खेळवले गेले असून, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर ऑस्ट्रेलियानेही उपांत्य फेरीतील आपलं स्थान जवळपास निश्चित केलेलं आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघांमध्ये चुरस आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंडपैकी एका संघाला उपांत्य फेरीतील चौथा संघ बनण्याची अधिक संधी आहे. मात्र दोघांचेही समान गुण आणि समान नेट रनरेट राहिल्यास कोण पुढे जाणार याबाबतची माहिती समोर आली आहे. 

पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या संघांनी आतापर्यंत प्रत्येकी आठ सामन्यांमध्ये ४-४ विजयांसह ८-८ गुण मिळवलेले आहेत. मात्र नेटरनरेटच्याबाबतीन न्यूझीलंडचा संघ आघाडीवर आहे. तर पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच सर्व साखळी सामने आटोपल्यानंतरही जर दोन्ही संघांचे गुण आणि नेट रनरेट समान राहिल्यास पुढच्या फेरीत जाण्याची संधी कुणाला मिळेल, याचं समिकरण पुढीलप्रमाणे आहे. 

वर्ल्डकप २०२३ चं पॉईंट्स टेबल पाहिलं तर न्यूझीलंडचा नेट रनरेट ०.३९८ आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट ०.०३६ आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेला एका धावेने पराभूत केले तर पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडला पछाडण्यासाठी शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर १३१ किंवा त्यापेक्षा अधिक फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

आता आपापले शेवटचे साखळी सामने खेळल्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे समान गुण आणि समान नेट रनरेट झाल्यास दोन्ही संघांची एकमेकांविरोधातील साखळी फेरीतील कामगिरी पाहिली जाईल. त्यामध्ये पाकिस्तानचं पारडं जड असेल. कारण साखळी लढतील पाकिस्ताननं न्यूझीलंडचा डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे असं झाल्यास न्यूझीलंडला मागे टाकून पाकिस्तानचा संघ थेट उपांत्य फेरी गाठेल. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंडपाकिस्तान