मुंबई : ऋषभ पंतने शंभर कसोटी सामने खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे नाव विक्रमांच्या यादीत दाखल होऊ शकेल, असे भाकीत माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने शुक्रवारी वर्तविले.
कसोटीत दोन तिहेरी शतकांची नोंद करणारा भारताचा एकमेव फलंदाज अशी सेहवागची दुसरी ओळख. शंभरावर कसोटी सामने खेळून ८५०० किंवा त्याहून अधिक धावा काढणाऱ्या ११ भारतीय खेळाडूंच्या यादीत सेहवागने स्थान मिळविले आहे. दुसरीकडे पंत हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकणारा एकमेव यष्टिरक्षक ठरला. त्याने चार वर्षांत ३० कसोटीत ४०.८५ च्या सरासरीने १९२० धावा केल्या. एका कार्यक्रमात सेहवाग पुढे म्हणाला, ‘पंतने शंभरावर कसोटी सामने खेळल्यास त्याचे नाव विक्रमी खेळाडूंच्या यादीत येऊ शकेल. टी-२० आणि वन-डे सामने जिंकले, तरी त्याचा प्रभाव अधिक काळ राहत नाही. कसोटीत केलेली कामगिरी मात्र चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते. पंतमध्ये क्षमता आहे. तो शंभर किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळू शकल्यास दिग्गजांच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकेल.’