नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेत बदली खेळाडूसाठी ( सबस्टिट्यूट ) नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. सामन्यात एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी येणारा खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टिरक्षण करू शकतो. आताच्या नियमानुसार केवळ क्षेत्ररक्षण करण्याची सुट आहे. पण, नवीन नियम लागू झाल्यास बदली खेळाडूला फलंदाजी व गोलंदाजीही करता येणार आहे. फलंदाज जखमी झाल्यास फलंदाजच बदली खेळाडू येऊ शकतो, तसाच नियम गोलंदाजांच्या बाबतितही असेल.या नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी लंडनमध्ये आयसीसीच्या बैठकित चर्चा होणार आहे. त्यानुसार हा नियम लवकरच लागू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान होणाऱ्या प्रत्येक सामन्यात या नियमाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स केरीला उपांत्य फेरीच्या सामन्या इंग्लंडविरुद्ध गंभीर दुखापत झाली होती. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर केरीच्या हनुवटीवर चेंडू आदळला आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. तरीही केरीनं प्राथमिक उपचार घेत फलंदाजी केली. त्याने चेहऱ्यावर पट्टी बांधली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानेही या नवीन नियमाचे समर्थन केले आहे.
वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघातील दोन सदक्य कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्ने यांच्यात टक्कर झाली होती. त्यानंतर दिमुथला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याचवेळी या नव्या नियमाची चर्चा झाली होती आणि तेव्हा फिंचने समर्थन केले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिलिप ह्यूज याच्या निधनानंतर या नियमाची चर्चा सुरू झाली होती. ह्यूजला 2014च्या शेफील्ड शील्ड स्पर्धेत सामन्यात बाऊंसर लागला होता. त्यात ह्यूजला प्राण गमवावे लागले होते.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या नियमाची सर्वप्रथम अंमलबजावणी केली होती. 2016-17च्या स्थानिक वन डे, बिग बॅश आणि महिला बिग बॅश लीगमध्ये हा नियम वापरण्यात आला होता. इंग्लंडनेही मागील हंगामात कौंटी क्रिकेटमध्ये या नियमाची अंमलबजावणी केली होती.
नियम काय सांगतो?सामन्यात एखादा फलंदाज दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले, तर त्याच्या जागी फलंदाजालाच बदली खेळाडू म्हणून येता येईल. याच नियमानुसार गोलंदाज जखमी झाला, तर गोलंदाजच बदली खेळाडू म्हणून मैदानावर येईल.