Join us  

Rishabh Pant: ऋषभ पंत फिट नसेल तर यष्टिरक्षक कोण? वनडे विश्वचषकास अवघे शंभर दिवस शिल्लक

Rishabh Pant: भारताच्या यजमानपदाखालील ५ ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यासाठी अवघे १०० दिवस उरले असताना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला टीम इंडियातील खेळाडूंचे संतुलन साधण्याची चिंता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 6:05 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखालील ५ ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यासाठी अवघे १०० दिवस उरले असताना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला टीम इंडियातील खेळाडूंचे संतुलन साधण्याची चिंता आहे. अशावेळी प्रत्येक जागेसाठी पर्याय शोधण्याचा निवड समितीचा विचार असेल.

याचाच एक भाग म्हणून सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाची संधी देण्यात आली होती. वेगवान गोलंदाज उमरान मलिकलादेखील संधी मिळाली. बाहेर असलेल्या कुलदीप यादवलादेखील खेळविण्यात आले. तज्ज्ञ फलंदाज आणि गोलंदाजांचे अनेक पर्याय शोधले गेले. हे पर्याय शोधताना एक डोकेदुखी मात्र कायम आहेच. निवडकर्ते आणि तज्ज्ञांकडे ज्या प्रश्नाचे उत्तर नाही, असा प्रश्न म्हणजे यष्टिरक्षक कोण? डावखुरा फलंदाज ऋषभ पंत अपघातात जखमी झाला. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याला तंदुरुस्त करण्यात व्यस्त आहे. पंत फिट नसेल तर त्याचा पहिला पर्याय कोण असेल, याबाबतचा गुंता कायम आहे.

लोकेश राहुल, संजू सॅमसन, इशान किशन आणि केएस. भरत यापैकी कुणाची वर्णी लागेल हे सध्यातरी सांगता येणार नाही. चौघांचा रेकॉर्ड, कामगिरी, त्यांची बलस्थाने आणि कच्चे दुवे काय आहेत, याचा वेध घेऊया... 

लोकेश राहुल : २०१९ च्या वनडे विश्वचषकात राहुलने तज्ज्ञ फलंदाज म्हणून ९ सामन्यांत ४५ च्या सरासरीने ३६१ धावा काढल्या.  सध्या तो खराब फॉर्ममध्ये आहे; पण अनुभव आणि फलंदाजीमुळे त्याला प्राधान्य मिळू शकते. त्याने देशासाठी ५४ सामन्यांत यष्टिरक्षण करीत ३२ झेल घेतले. दोनदा फलंदाजांना यष्टिचितही केले होते. राहुल फिरकी आणि वेगवान मारा खेळण्यास सक्षम आहे. मोठे फटके मारू शकतो. फिटनेस मात्र कमकुवत आहे. 

संजू सॅमसन : केरळचा संजू  सॅमसन उत्कृष्ट पर्याय ठरतो. मात्र, कामगिरीत सातत्य नाही. कधी फॉर्म, तर कधी जखमेमुळे तो आतबाहेर होत राहिला. तांत्रिकदृष्ट्या तो भक्कम असून, दडपण झुगारून खेळतो. पंतच्या जागी पाचव्या स्थानावर खेळण्यास योग्य आहे. ११ वन-डेत ३३० धावा असून, यष्टीमागे सात झेल आणि दोन यष्टिचित त्याच्या नावावर आहेत.  वनडेत स्ट्राइक रेट चांगला. संयमी खेळू शकतो. सहज बाद होत नाही. पूर्णवेळ यष्टिरक्षण करू शकतो. 

ईशान किशन : ईशान हा देखील पंतचा पर्याय मानला जातो.  वनडेत बांगलादेशविरुद्ध त्याने द्विशतक ठोकले. मागच्या दहा डावांत त्याने दुहेरी शतकासह तीन अर्धशतके ठोकली. १४ सामन्यात ५१० धावा असल्या तरी सातत्यपूर्ण कामगिरीत माघारतो. पाचवेळा तो २० हून कमी धावा काढून बाद झाला.  यष्टीमागे त्याने पाच झेल घेतले असून दोन फलंदाजांना यष्टिचित केले आहे. मोठे फटके मारतो शिवाय यष्टिरक्षणही चांगले करतो.

केएस भरत : या यष्टिरक्षकाने अद्याप वनडेत पदार्पण केलेले नाही.  यंदा जानेवारीत सॅमसनऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात आली, पण एकही सामना खेळू शकला नव्हता. स्थानिक क्रिकेटमध्ये ६४ सामन्यांत त्याच्या १९५० धावा आहेत. यष्टिरक्षणात भरत हा संघाची ताकद ठरू शकतो. लिस्ट अ सामन्यात त्याने ६९ झेल आणि १३ स्टम्पिंग आहेत. विश्वचषक संघात भरतला स्थान मिळेल, याबाबत शंका वाटते.  

टॅग्स :रिषभ पंतवन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ
Open in App