BCCI ने नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारच्या घोषणेनंतर इंडियन प्रीमिअऱ लीग विरुद्ध देशांतर्गत क्रिकेट असा वाद सुरू होताना दिसतोय. इशान किशन व श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळण्याच्या निर्णयाचे स्वागत होत असताना हे युवा खेळाडू टीकेच्या तोंडावर आले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा व बीसीसीआय यांनी भारतीय खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. पण, त्याकडे काणाडोळा केल्याने बीसीसीआयला कठोर पाऊल उचलावे लागले. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील अष्टपैलू खेळाडू मदन लाल यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मानसिक थकवा असल्याचे सांगून मायदेशात परतलेला इशान देशांतर्गत क्रिकेट खेळायचे सोडून आयपीएल २०२४च्या तयारीला लागला. हार्दिक पांड्यासह तो बडोदा येथे आयपीएलसाठी सराव करताना दिसला. श्रेयसनेही तंदुरुस्त असूनही रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याकडे पाठ फिरवली. आता तो उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. त्यामुळे मदन लाल यांनी बीसीसीआयने या दोघांबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. आयपीएलला महत्त्व देणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं पाहिजे, असे ते म्हणाले.
"जर बीसीसीआयने त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सांगितले असेल, तर त्यांनी ते ऐकायलाच हवे. खेळापेक्षा कोणीही मोठा नाही. बीसीसीआयने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे अनिवार्य केल्यामुळे, त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. बहुतेक आयपीएलमुळे आजकाल खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटला गृहीत धरत आहेत. प्रत्येक खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे असा नियम BCCI ने केला आहे. त्यामुळे तुम्ही नियम पाळाले नाही तर इशान व श्रेयस यांच्यासारखी कारवाई तुमच्यावर होईल, असे उदाहरण बीसीसीआयने सेट केले आहे,” असे लाल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.