नवी दिल्ली : अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडला. पुढच्या वर्षी अर्थात २०२३ चा वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेच्या आधीच भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डामध्ये वाद सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या आधी आशियाई संघटनेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आगामी आशिया चषकाची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर बीसीसीआयने ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे.
बीसीसीआयच्या या मागणीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील लांबलचक पत्रक काढून भारतावर निशाणा साधला होता. याशिवाय भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकावर पाकिस्तान बहिष्कार टाकेल अशी धमकी देखील पीसीबीने दिली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यक्ष रमीझ राझा यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. जर पाकिस्तान पुढच्या वर्षी भारतात होणार्या विश्वचषकात सहभागी झाला नाही, तर ते कोण पाहणार? असे रमीझ राजा यांनी म्हटले आहे.
...तर पाकिस्तान देखील भारतात येणार नाही
रमीझ राजा यांनी म्हटले, "जर भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पुढच्या वर्षी आमच्याशिवाय विश्वचषक खेळावा लागेल. याबाबत आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे आणि मी नेहमीच म्हटले आहे की आम्हाला पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही चांगले खेळू. मागील वर्षी आम्ही विश्वचषकामध्ये भारताचा पराभव केला होता. आशिया कपमध्येही आम्ही भारताचा पराभव केला. पाकिस्तान संघाने बिलियन डॉलर इकॉनॉमी संघाचा दोनदा पराभव केला आहे."
याशिवाय भारतीय संघ आगामी २०२३च्या आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तान संघ देखील भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी येणार नाही असे रमीझ राजा यांनी म्हटले. खरं तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती कमजोर आहे म्हणूनच पाकिस्तानात मोठ्या स्पर्धा व्हाव्यात अशी अपेक्षा पीसीबीची आहे. मात्र बीसीसीआयने घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा चांगलेच आक्रमक झाले आहेत.
२०२३ मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा
- - आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- - आयसीसी १९ वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- - आशिया चषक २०२३, पाकिस्तान
- - आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"