आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांदरम्यान हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. भारतीय महिला संघ ब गटात दुसऱ्या स्थानावर राहत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ अ गटामध्ये आपले सर्व सामने जिंकून पुढे पोहोचला आहे.
या सामन्यादरम्यान केप टाऊनमधील हवामानावरही क्रिकेटप्रेमींची नजर असेल. याच स्पर्धेत भारतीय संघाच्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी पाऊस आला होता. तसेच डकवर्थ लुईस प्रणालीद्वारे निर्णय झाला होता. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज केप टाऊनमध्ये पाऊस पडण्याची कुठलीही खास शक्यता नाही आहे. हवामानाची परिस्थिती ही क्रिकेटसाठी उत्तम आहे. तसेच क्रिकेटप्रेमींना संपूर्ण खेळाचा आस्वाद मिळण्याची शक्यता आहे.
जर आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस आला आणि निकाल लागण्यासाठी आवश्यक षटकांचा खेळ झाला नाही तरीही चिंतेची कुठलीही बाब नसेल. कारण आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद केलेली आहे. म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी पाऊस किंवा अन्य कुठल्याही कारणाने सामना झाला नाही तर पुढच्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी जिथे सामना थांबला होता. तिथूनच सामना पुढे खेळवला जाईल.
जर राखीव दिवशीसुद्धा सामन्याचा निकाल लागला नाही. म्हणजेच जर खेळच झाला नाही. नाणेफेक आणि एकाही चेंडूचा खेळ होण्याआधी पावसामुळे सामना रद्द झाला तर गटसाखळीमधील गुणतालिकेच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाकडे अंतिम फेरीत जाण्याची सुवर्णसंधी असेल. कारण हा संघ गट अ मध्ये अव्वलस्थानावर होता.
या सामन्यासाठीचे संभाव्य दोन्ही संघभारत - स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे. पूजा वस्तारकर, रेणुका सिंह ठाकूर. ऑस्ट्रेलिया - मेग लॅनिंग, बेथ मूनी, एलिसा हिली, एलिसा पेरी, एश्ले गार्डनर, ताहिलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जेस जॉन्सन, एलाना किंग, मेगन शूट, डार्सी ब्राऊन.