लीडर असावा तर धोनीसारखा, वीरेंद्र सेहवागकडून कौतुक

छा गये गुरू : मुलाखतीत वीरेंद्र सेहवागचे षटकावर षटकार, कारकिर्दीलाही दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 01:42 PM2019-04-13T13:42:52+5:302019-04-13T14:00:14+5:30

whatsapp join usJoin us
If there is a leader, like MS Dhoni, praise from Virender Sehwag | लीडर असावा तर धोनीसारखा, वीरेंद्र सेहवागकडून कौतुक

लीडर असावा तर धोनीसारखा, वीरेंद्र सेहवागकडून कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सचिन कोरडे 
पणजी : जेव्हा बॅट चालत होती तेव्हाही बॅटने मनोरंजन करायचो. क्रिकेटनंतर काय? असा प्रश्न पडला होता त्यामुळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करीत आहे. कारण मुळात ‘मेरा कामही है एंटरटेन्टमेंट करना’! सोशल मीडियावर सेहवाग नेहमीच ‘अ‍ॅक्टिव्ह’ असतो. कधी त्याच्यावर टिकेचा भडिमारही होतो, असे का? या प्रश्नावर वीरेंद्र सेहवागने चपखल उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने त्याच्यातील उपजत स्वभाव स्पष्ट दिसून आला.

गोवा फेस्ट’ या कार्यक्रमासाठी वीरेंद्र सेहवाग गोव्यात आला होता. कार्यक्रमांतर्गत सेहवागची जाहीर मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत सेहवागने आपल्या क्रिकेटबद्दलच्या आठवणींना उजाळा दिल्या. त्याने सर्वच प्रश्नांना जबरदस्त उत्तरे देत षटकार-चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या उत्तरांनी उपस्थित चाहत्यांचे चांगले मनोरंजन झाले. सेहवाग मैदानात जसा खेळत होता तसाच तो प्रश्नांना मागे टाकत होता.
जर्सी नंबरचा किस्सा

जर्सी बनविणाऱ्या कंपनीने ४४ नंबरची जर्सी बनविली होती. त्यावेळी माझ्या जागी साईराज बहुतुलेची निवड होणार होती. त्यामुळे जर्सीवर बहुतुले याचे नाव होते. मात्र माझी भारतीय संघात निवड झाली. ४४ वा नंबर असल्याने तो मी झाकू शकलो नाही. नाव मात्र झाकले. हाच नंबर माझ्या पाठीवर राहिला. त्यानंतर मी खेळत राहिलो. २००५ मध्ये माझा खराब वेळ आला तेव्हा माझ्या आईने मला हा नंबर बदलायला सांगितले. आई थोडी अंधश्रद्धाळू होती. तिच्या सांगण्यावरून मी ४६ वा नंबर घेतला. त्यानेही काही झाले नाही. त्यानंतर अ‍ॅस्ट्रोलॉजीचे पुस्तक वाचणाºया माझ्या पत्नीने मला २ नंबर असायला हवा, असा सल्ला दिला. त्यानेही काही झाले नाही. एक मात्र झाले सासू-सुनेचे मात्र वाजले आणि त्यात मी अडकलो. कारण ऐकायचे कुणाचे हा प्रश्न होता. यावर उपाय काढत मी एका सामन्यात ४६ आणि एका सामन्यात २ नंबरची जर्सी घालायचो. त्यानेही काही झाले नाही. मी नंबरसह जर्सी घालणेच बंद केले. यामुळे दोघी खुश झाल्या.
 

शशी काळेंनी घेतली होती परीक्षा....
शशी काळे यांनी मला दिल्लीत बोलविले होते. त्यांनीच नजफगढमधून बाहेर जाण्याचे सांगितले. मला दिल्लीतील शाळा सुचविली. तेथे २००-२५० खेळाडू आले होते. जेव्हा मी तेथे गेलो तेव्हा मला तीन दिवस ना बॅटिंग मिळाली ना बॉलिंग. चौथ्या दिवशी मला केवळ सहा चेंडू खेळायला मिळाले. मी त्यांना विचारलं की माझ्यासोबत असे का केले. त्यावर त्यांनी मला सांगितले की बेटा ही तुझ्यातील संयमाची परीक्षा होती. तू जेव्हा आला होता तेव्हा दोनशे खेळाडू होते आता केवळ ७० आहेत. त्यात तू यशस्वी झालास. तू ‘लंबी रेस का घोडा’ आहेस.

माझ्या मते चार खेळाडू ‘लिजंड’
माझे काही मित्र मला ‘लिजंड’ म्हणून संबोधतात. पण मी त्याला मानत नाही. सचिन तेंडुलकर जर लिजंड असेल तर सचिन-सेहवागमध्ये फरक तरी काय? भारतात सध्या तीन-चार खेळाडू लिजंड वर्गात आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे. इतर ग्रेट खेळाडूंमध्ये मोडतात.  

धोनी, सचिनच्या चित्रपटावर..
मी सामन्य कुटुंबातून पुढे आलो आहे. घरी छोटासा टीव्ही होता. घरच्यांना क्रिकेटचे काहीच माहीत नव्हते. मी पहाटे ३ वाजता केवळ क्रिकेट बघण्यासाठी उठायचो. माझी शाळा १०० मीटरवर होती. त्यामुळे मला क्रिकेट खेळायला वेळ मिळायचा. शाळा सुटली की कुठेही क्रिकेट असले की जायचो. त्या काळात खूप कष्ट केले. हे कष्ट आज तुम्हाला दिसत नाहीत. आम्ही केवळ जाहिराती करतो असे लोकांना दिसते. तसे नाही. सुरुवातीच्या काळातील खेळाडंूचे कष्ट दिसत नाहीत. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांनी केलेले कष्ट चित्रपटातून दिसत आहेत, असे सांगत सेहवागने आपल्यावर चित्रपट बनावा, अशी जणू इच्छाच व्यक्त केली. 

‘बेस्ट कॅप्टन’ आणि का?
भारतीय क्रिकेटला खूप कर्णधार मिळाले. मात्र, वीरेंद्र सेहवागच्या मते सर्वोकृष्ट कर्णधार हा सौरव गांगुली आहे. कारण सौरवने खरा संघ तयार केला होता. सौरवनेच आम्हाला जिंकण्याची सवय लावली होती. सौरवनंतर मी धोनीला दुसºया स्थानावर ठेवणार आणि त्यानंतर विराट कोहली हा चांगला कर्णधार आहे, असे म्हणणार. कारण, धोनीला तयार संघ मिळाला होता. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली आपण कसोटी किकेटमध्ये पहिल्या स्थानाच्या जवळपास पोहोचलो. त्यानंतर धोनीला ते मिळवता आले. खरे श्रेय हे कुंबळेलाही जाते. 

बालपणातच करिअर संपले असते...
मी तेव्हा ८व्या वर्गात होतो. मला आठवतंय की तेव्हा नजफगढ येथे केवळ एकच मैदान होते आणि या मैदानावर सगळीकडे बारीक दगड असायचे. गोलंदाजाने चेंडू फेकला तो फलंदाजाला मारता आला नाही. तेव्हा मी क्षेत्ररक्षण करीत होतो. चेंडूमुळे दगड उडाला आणि सरळ माझ्या दातावर आदळला. त्यात माझा दात तुटला. मला जखम झाल्याचे काहीच वाटत नव्हते. मी माझा तुटलेला दात शोधत होतो. दात मिळाला नाही. तसाच घरी गेलो. ओठ सुजला होता. वडिलांना माहीत झाल्यावर त्यांनी मला क्रिकेट खेळण्यास मनाई केली. एका कोपºयात जाऊन मी खूप रडत होतो. हे आई पाहात होती. अखेर तिनेच मला खेळण्याची परवानगी दिली. खरंच तेव्हा तिने मला प्रोत्साहन दिले नसते तर कदाचित मी क्रिकेटपटू झालो नसतो. 

भारत-पाकिस्तान सामना युद्धापेक्षा कमी नाही
विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर वीरेंद्र सेहवागने यापूर्वी सुद्धा भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे, असे मत व्यक्त केले होते. आजही त्याची तीच भूमिका आहे. तो म्हणाला, देशाच्या हितासाठी जे आवश्यक असेल तेच करायला हवे मग ते क्रिकेट असो वा युद्ध. आपण युद्ध जिंकायलाच पाहिजे. ते गमावता कामा नये. विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला हवे. 

लीडर असावा धोनीसारखा...
सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. अशा वेळी वैयक्तिक जीवनात तुला चांगला नेता कसा असावा असे वाटते? या प्रश्नावर सेहवागने धोनीचे उदाहरण दिले. चांगला ‘लीडर’ हा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा असतो. एखाद्या कंपनीचा सीईओ हा एकटाच काम करीत नसतो. इतर कर्मचारी काम करतात म्हणून कंपनी पुढे जात असते. सध्या आयपीएल सुरू आहे. धोनी हा उत्तम कर्णधार का? हे त्यावरूनही सांगता येईल. कारण धोनीच्या संघात सर्वात कमकुवत गोलंदाज आहेत. सध्या ते कोणत्याच देशाच्या संघात नाहीत. अशा गोलंदाजांची टीम घेऊन धोनी आजही नंबर वनवर आहे, ते फक्त त्याच्यातील उत्कृष्ट नेतृत्वगुणांमुळेच. 

वीरूचा तो ‘अ‍ॅडव्हाइस’...
कधी कधी तुमचा सल्ला फायदेशीर ठरतो तर कधी महागडा. असे दोन किस्से आहेत जे आजही आठवले की खूप हसायला येते. आम्ही इंग्लंडमध्ये खेळत होतो. सचिन तेंडुलकर खूप संथगतीने खेळत होते. मी वेगात धावा काढत ५० च्या पुढे निघून गेलो होतो. अ‍ॅश्ले जाइल्स हा तेंडुलकरच्या पायात चेंडू टाकत होता. आणि त्यांना त्रस्त करत होता. मी त्यांच्या जवळ गेलो आणि ‘पाजी मारो’ असे सांगू लागलो. तेव्हा मी त्यांना स्टेप आउट करून मारण्याचा सल्ला दिला. कारण मी अ‍ॅश्लेला रिव्हर्स, स्टेप आउट करून मारत होतो. सचिननी माझा सल्ला ऐकला आणि स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात ते दुसºयाच चेंडूवर बोल्ड झाले. मी मात्र डोक्यावर हात ठेवला. कारण कारकिर्दीत ते असे पहिल्यांदाच बाद झाले होते. दुसरा किस्सा अनिल कुंबळेसाबतचा आहे. तो असाच होता.

Web Title: If there is a leader, like MS Dhoni, praise from Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.