IPL 2024 Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली MI ची विजयाची पाटी अद्याप कोरीच आहे आणि Point Table मध्ये हा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स वगळता इतर सर्व संघांनी किमान एक लढत जिंकली आहे. रोहित शर्माला ( Rohit Sharma) कर्णधार म्हणून हटवल्यानंतर चाहत्यांचा हार्दिकवर राग होताच. काल घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात मुंबईला हार पत्करावी लागल्याने चाहत्यांच्या नाराजीत भर पडली आहे. हार्दिकने कालच्या लढतीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट लिहीली...
माझ्या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली...! हार्दिक पांड्या काय म्हणाला ऐका...
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १२५ धावा करता आल्या. हार्दिक पांड्या ( ३४) व तिलक वर्मा ( ३२) यांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्मा, नमन धीर व डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना ट्रेंट बोल्टने गोल्डन डकवर माघारी पाठवले. टीम डेव्हिड (१७) व इशान किशन ( १६) यांनी योगदान दिले. राजस्थान रॉयल्ससाठी बोल्ट व युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी ३, तर नांद्रे बर्गरने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १५.३ षटकांत ४ बाद १२७ धावा करून सामना जिंकला. रियान परागने नाबाद ५४ धावा करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. RR ने सलग तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिकने पोस्ट लिहिली की, हा संघ प्रयत्न करणं कधीच थांबवत नाही, हे या संघाबद्दल तुम्हाला माहित असायला हवे. आम्ही संघर्ष करत राहणार आणि पुढे वाटचाल करणार.