मोहाली - ख्रिस गेल म्हणजे एक झंझावात. गेल या वादळापुढे क्रिकेटधमले जवळपास सारेच देश लोटांगण घालताना साऱ्यांनी पाहिले आहेत. गोलंदाजांचा कर्दनकाळ, अशीच गेलची ओळख क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. क्रिकेट चाहत्यांना त्याच्या फलंदाजीचे वादळ पाहण्याचा योग काल रविवारी आला. यावेळी गेलच्या वादळाचा तडाखा बसला धोनीच्या चेन्नई संघाला.
आयपीएल 11 च्या लिलावात विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला कोणत्याही संघानी घेण्यासाठी पुढाकार दाखवला नाही. वाढत्या वयामुळं त्याच्यावर बोली लावताना प्रत्येक संघमालकाने विचार केला. 38 वर्षीय गेलला दोनवेळा लिलावात नाव घोषित करुन कोणत्याही संघानं खरेदी केलं नव्हतं, पण लिलावाच्या अंतिम चरणात पुन्हा एकदा त्याला लिलावत उतरवण्यात आलं, आणि तिसऱ्यावेळी गेलला पंजाबनं खरेदी केलं. पंजाबनं गेलला दोन कोटींच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केलं होतं. काल आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळणाऱ्या गेलने स्फोटक फंलदाजी करत वयचा आणि खेळाचा संबध नसल्याचे दाखवले. वाघ म्हातारा झाला तरी तो वाघच असतो असे काल गेलने दाखवून दिले.
काल रविवारी झालेल्या सामन्यात गेलने 33 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली. राहुल आणि गेलने पहिल्या पाच षटकांमध्ये या दोघांनी कुठलीही जोखीम न उठवता संघाचे अर्धशतक फलकावर लावले. गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. गेलच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने पहिल्या दहा षटकांत 115 धावा फलकावर लागल्या होत्या. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेलच्या या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजबाने 20 षटकांत 197 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना, धोनीच्या चेन्नईला 5 बाद 193 धावाच करता आल्या. धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.
पंजाबचा कर्णधार अश्विनने नाणेफेकीनंतर संघात गेल असल्याचे जाहिर केलं. त्यावेळी पुर्ण स्टेडियममध्ये गेल नावाचा गजर घुमला होता. गेलने जगभरात सर्व टी-20 लीगमध्ये खेळताना 11 हजारांपेक्षा आधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 20 शतक आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे.