कराची : टी-२० विश्वचषकाच्या ऐन तोंडावर माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक मिस्बाह उल हकने पाकिस्तान क्रिकेटला प्रथमच धारेवर धरले. काही दिवसापूर्वी पदाचा राजीनामा देणारे मिस्बाह यांनी व्यवस्थेत बदल होईपर्यंत पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होणार नाही, अशी जळजळीत टीका केली. अपेक्षित निकाल न मिळाल्यास बळीचा बकरा बनविले जाते. ही सवय बदलावी लागेल. कॉस्मेटिक सर्जरीने (वरवरच्या सुधारणा) केल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल होणार नाहीत,’ असे मत त्यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘समस्या या व्यवस्थेत खोलवर रुजल्या असून जे चांगले काम करतात, त्यांच्या मागे तथाकथित लोक हात धुऊन मागे लागतात. त्यांना सुधारणा करणारे लोक नको असतात. हुजरेगिरी करणाऱ्यांना पीसीबीत मोठा मान मिळतो,’ असे मिस्बाह यांनी ए स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पीसीबीची खरी समस्या म्हणजे आमचे क्रिकेट केवळ निकाल बघते. पुढील योजना राबविण्यास आणि व्यवस्था सुधारण्यास थोडा वेळ लागतो, हे समजून घेण्यास आमच्याकडे वेळ आणि संयम नाहीच. आमच्या खेळाडूंचा विकास स्थानिक पातळीवरच करावा लागेल, नंतरच राष्ट्रीय संघात त्यांच्या कौशल्याला वाव मिळू शकेल, याकडे आमचे लक्ष नाही. आम्हाला झटपट निकाल हवे असतात, ते मिळाले नाहीत तर कुणालाही बळीचा बकरा बनविण्यास आम्ही तयारच असतो,’ असे कुणाचेही नाव न घेता मिस्बाह यांनी म्हटले आहे.दुर्दैवाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये बळीचा बकरा शोधणे, आता सामान्य बाब झाली आहे. एक सामना किंवा मालिका गमावल्यानंतर स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी आम्ही बळीचा बकरा शोधतो. हीच कॉस्मेटिक सर्जरी होत राहिली तर काहीही बदलणार नाही! तुम्ही कोच आणि खेळाडूंना बदलू शकता, मात्र आतील समस्या जशीच्या तशी कायम राहील. - मिस्बाह
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पाकिस्तानमध्ये ‘बळीचा बकरा’ बनविले जाते- मिस्बाह उल हक
पाकिस्तानमध्ये ‘बळीचा बकरा’ बनविले जाते- मिस्बाह उल हक
पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर जळजळीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 9:00 AM