Join us  

...मग आम्हीही तुम्हाला पाकिस्तानात बोलावणार नाही; PCB अध्यक्षांचे जय शाह यांच्यावर गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) प्रमुख नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आशिया कप २०२३ संदर्भात जे काही निर्णय घेतले जात आहेत ते एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:02 AM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) प्रमुख नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आशिया कप २०२३ संदर्भात जे काही निर्णय घेतले जात आहेत ते एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. याबाबत पाकिस्तान बोर्डाकडून किंवा इतरांकडून कोणताही सल्ला घेतला जात नसल्याचेही ते म्हणाले.  नजम सेठी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटबाबत आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह ( Jay Shah)  यांनी एकट्याने निर्णय घेऊ नये. त्याचा संदर्भ आशियाई क्रिकेट परिषदेच्या पुढील दोन वर्षांच्या वेळापत्रकाचा आणि रोडमॅपचा होता. यामध्ये आशिया कप २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

नजम सेठी यांनी ट्विट करत जय शाह यांचा समाचार घेतला. आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र त्यांनी एकट्याने निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा तुम्ही खूप काही करत असाल, तेव्हा तुम्ही पाकिस्तान सुपर लीग २०२३ चे वेळापत्रकही जाहीर करा, असा टोला त्यांनी जय शाह यांना मारला.   स्पोर्ट्स तकशी बोलताना नजम सेठी म्हणाले की, एकट्याने घेतलेल्या निर्णयावर मला राग किंवा आश्चर्य वाटत नाही. संपूर्ण परिषदेत कोणाशीही बोलणे झालेले नाही. अशा प्रकारे उद्या मीही प्रमुख झाल्यावर घरी बसून निर्णय घेईन. निदान फोन तरी करायला हवा होता. आशियाई क्रिकेट परिषदेच्या विकास मंडळाने हे निर्णय घेतले. या मंडळात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व नव्हते. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवण्यातही नाही आले.  

'माझ्या माहितीनुसार आम्हाला सांगण्यात आले नव्हते. आमच्यासाठी हा निर्णय अचानक आला. याआधीही जय शहा यांनी विधान केले होते, ज्यावर माझ्या आधी हे पद भूषवणाऱ्या रमीज राजा यांनी आक्षेप घेतला होता आणि तेही संतापले होते. गोष्ट अशी आहे की एकीकडे पाकिस्तानने भारतात येऊन वर्ल्ड कप खेळावा अशी तुमची इच्छा आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणता की आम्ही पाकिस्तानात जाऊन आशिया चषक खेळणार नाही. उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे, तेही खेळणार नाहीत का? 

ते पुढे म्हणाले, 'तुमची तत्त्वे असतील, तर तुम्ही पाकिस्तानला भारतात खेळण्यासाठी बोलावणार नाही. मग आम्हीही तुम्हाला पाकिस्तानात या असं सांगणार नाही. क्रिकेटपासून राजकारण दूर ठेवा. बीसीसीआय हे स्वतंत्र मंडळ आहे. आम्ही स्वतंत्र नाही आणि सरकारचा भाग आहोत. प्रत्येक गोष्टीला सरकारकडून मंजुरी घ्यावी लागते हे उघड आहे. बीसीसीआय खाजगी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट व्हायला हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2022जय शाह
Open in App