- अयाझ मेमन
भारत-श्रीलंका दरम्यानची पहिली कसोटी लढत अनिर्णित राहिली असली, तरी माझ्या मते मानसिकरित्या भारताचा विजय झाला. कारण पहिल्या डावात फलंदाजी ढासळल्यानंतरही भारतीय संघ शतकी धावांनी पिछाडीवर पडला होता. मात्र, तरीही अखेरच्या दिवशी लंकेचे ७ बळी घेत भारताने सामना आपल्याबाजूने झुकविला होता. सामन्यातील पहिले दोन दिवस पावसाने धुऊन गेले होते. त्यामुळेच, जर का ५-७ षटकांचा आणखी खेळ झाला असता, तर या सामन्याचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता. मला दोन गोष्टींचे
कौतुक करावेसे वाटते. एक म्हणजे भारतीय संघात गुणवत्ता ठासून भरलेली आहे.
पहिल्या डावात फलंदाजी कोसळली मान्य आहे, पण दुसºया डावात जबरदस्त भरपाई करत जी कामगिरी केली ते अप्रतिम. प्रथम सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली, त्यानंतर विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. यावरून कळतं की भारतीयांनी किती पटकन धडा शिकला. शिवाय, भारतीयांनी स्वत:वरील विश्वास कधीच सोडला नाही. १२२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतरहीभारतीय डगमगले नाहीत. दुसरा डाव लवकर घोषित करायला पाहिजे होता, असा काहींचा सूर निघत आहे. पण माझ्यामते योग्यवेळी डाव घोषित करण्यात आला. भारतीय संघाला नशीबाने साथ दिली असती, तर विजय भारताचाच होता. याचे सर्व श्रेय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या विचारसरणीला द्यायला हवे.
दोन दिवस बॅकफूटवर राहिल्यानंतरही त्यांनी विजयाची आस सोडली नाही.
कामगिरीचा विचार केल्यास, भारतासाठी या सामन्यात तीन खेळाडू हीरो ठरले. एक म्हणजे भुवनेश्वर कुमार-महंमद शमी ही वेगवान जोडी. भुवीने, खास करुन दुसºया डावात ज्याप्रकारे गोलंदाजी केली ती जबरदस्त होती. त्याने संघाला विजयाजवळ आणले होते. सामनावीर ठरताना त्याने ८ बळी घेतले. त्याच्या स्विंग गोलंदाजीमध्ये आता वेगही आल्याने फलंदाजांपुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे फलंदाजांची मानसिकता तो चांगल्या प्रकारे ओळखतो. दुसरीकडे, मोठ्या कालावधीनंतर महंमद शमीचे पुनरागमन झाले. त्याच्याकडे कमालीचा वेग आहे. उमेश यादवकडून त्याला चांगली साथही मिळाली. दखल घेण्याची बाब म्हणजे संपूर्ण सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांना एकही बळी मिळाला नाही, जे पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये घडले आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाज सामना जिंकवू शकतात, हा बदललेला विचार भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठा आहे.
तसेच, विराट कोहली ज्याप्रकारे पहिल्या डावात भोपळाही न फोडता बाद झाला, ते अनपेक्षित होते. गेल्या काही कसोटी डावात तो सातत्याने अपयशी ठरत होता. परंतु, यानंतर त्याने दुसºया डावात जबरदस्त शतक ठोकले. त्याने सुरुवातीला डाव सावरण्यात वेळ घेतला. कारण, आघाडीचे फलंदाज बाद झाले होते. जम बसल्यानंतर त्याने जो काही वेग पकडला आणि शतक ठोकले ते शानदार होते. वेगवान शतक
ठोकत त्याने डाव घोषित केला आणि त्यामुळे आक्रमण करण्यात भारताला वेळही मिळाला. त्यामुळेच एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून कोहलीचे या सामन्यात अमूल्य योगदान होते.
(संपादकीय सल्लागार)
Web Title: If you had received more than 5-7 overs ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.