Babar Azam, Bangladesh vs Pakistan: बांगलादेशच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर केला. पहिल्या सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवल्यानंतर बांगलादेशच्या संघाने दुसरी कसोटीही जिंकली. पाकिस्तानने पहिल्या डावात २७४ तर बांगलादेशने २६२ धावा केल्या. अतिशय कमी धावांचा लीड घेऊन पाकिस्तानने दुसऱ्या डावात केवळ १७२ धावा केल्या. १८५ धावांचे आव्हान बांगलादेशने ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. यानंतर पाकिस्तानच्या संघावर टीका होत आहे. त्यातही प्रामुख्याने बाबर आझम टीकेचे लक्ष्य ठरत आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू बाबर आझमवर तोंडसुख घेत आहेत. पण याच दरम्यान, पाकिस्तानचा एक माजी खेळाडू मात्र बाबर आझमच्या बचावासाठी पुढे आला आहे.
"मी बाबर आझमला पाठिंबा का देतो असे सगळेजण मला का विचारताय? त्याने एका सिरीजमध्ये ५०० धावा केवळ माझ्या पाठिंब्यामुळे केल्या आहेत का? मी कुणालाही अशी विनंती करतोय का की बाबर आझमला मतं द्या? गेल्या चार वर्षांच्या कालावधीत बाबर आझमपेक्षा चांगला क्रिकेटपटू पाकिस्तान क्रिकेटमध्ये कुणाला दिसलाय का? पाकिस्तानचा संघ फारसा टेस्ट क्रिकेट खेळत नाही. पण बाबर आझम मात्र क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे यात दुमत असूनच शकत नाही," असे रोखठोक मत पाकिस्तानी माजी सलामीवीर सलमान बट याने मांडले.
"बाबर आझमने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून सर्वाधिक धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या संघातील एकही खेळाडू धावांच्या बाबतीत बाबर आझमच्या जवळपास देखील नाही. जर तुमच्या देशाच्या सर्वोत्तम खेळाडूला आणि एका उत्कृष्ट क्रिकेटपटूला पाठिंबा न देता संघाबाहेर बसवायच्या गोष्टी करत असाल तर मग त्याच्या जागी तुमच्याकडे कुणी आहे का? मला बाबर आझमपेक्षा चांगला क्रिकेटर शोधून दाखवा, त्याला संघात आणा आणि खेळवून दाखवा," असं थेट चॅलेंजच सलमान बटने टीकाकारांना दिले.