नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. रविवारच्या सामन्यात भारतीय संघाचा विजयरथ रोखून पाकिस्तानने शानदार विजय मिळवला. पाकिस्तानने 5 बळी आणि 1 चेंडू राखून विजय मिळवत सुपर-4 मधील दुसरा सामना आपल्या नावावर केला आहे. आशिया चषकाच्या बहुचर्चित स्पर्धेत हे कट्टर प्रतिस्पर्धी दोनवेळा आमनेसामने आले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. रविवारच्या सामन्यात भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) आसिफ अलीचा झेल सोडला त्यामुळे त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, अर्शदीपने सोडलेल्या झेलमुळेच भारताचा पराभव झाला असल्याचा सूर चाहत्यांमध्ये आहे. पाकिस्तानी संघाची धावसंख्या 4 बाद 151 असताना आसिफने हवेत फटकार मारला मात्र अर्शदीपला झेल घेण्यात अपयश आले. आसिफने 8 चेंडूंत 16 धावांची महत्त्वाची खेळी केली, ज्यामध्ये 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अर्शदीप सिंगवर चहुबाजूंनी टीका होत असताना अनेक आजी माजी भारतीय खेळाडू अर्शदीपच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. विराट कोहलीने पत्रकार परिषदेतून आपला पाठिंबा दर्शवला होता. हरभजन सिंग, आकाश चोप्रा, युवराज सिंग अशा दिग्गजांनी अर्शदीप सिंगच्या टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. अशातच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील अर्शदीपच्या मदतीला धावून आला आहे.
दम असेल तर समोर या - शमी टाइम्स नाउ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना शमीने म्हटले, "ट्रोलर्स फक्त आम्हाला ट्रोल करण्यासाठी जगतात. त्यांना दुसरे कोणतेच काम नाही. जेव्हा आम्ही चांगली कामगिरी करतो तेव्हा ते म्हणत नाहीत की तुम्ही चांगला झेल घेतला पण तेव्हा ते ट्रोल करतील का? जर दम असेल तर खऱ्या अकाउंटवरून समोर या ना, फेक अकाउंटवरून कोणीही मेसेज करू शकते." मोहम्मद शमीला देखील मागील काळात अशाच पद्धतीने ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता त्याचाच दाखला देत शमीने ट्रोलर्सला चांगलेच सुनावले आहे.
अर्शदीपला दिला सल्ला मला यापूर्वी ट्रोलिंगचा अनुभव आहे पण माझा देश नेहमीच माझ्यासोबत उभा राहिला आहे. तसेच अर्शदीपला भविष्यात चमकण्यासाठी शमीने पाठिंबा दिला आहे. "मी याचा सामना केला आहे आणि त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही कारण माझा देश माझ्यासाठी उभा आहे. मी फक्त अर्शदीपला म्हणेन की, तुझी प्रतिभा अफाट आहे म्हणून हे याचा बळी ठरू नकोस", असे मोहम्मद शमीने अधिक म्हटले.
मागील वर्षीच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने 10 बळी राखून भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर शमीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी देखील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शमीला पाठिंबा दर्शवला होता. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी 2019 ते 2021 पर्यंत पंजाब किंग्जच्या संघाचा हिस्सा होते.