- सौरव गांगुली लिहितात...
द. आफ्रिका-भारत यांच्यात झालेला पहिला सामना कसोटीतील उत्कृष्ट खेळाचा नमुना होता. या सामन्यात गोलंदाजांनी फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. सामन्याचे वैशिष्ट्य असे की चौथ्या दिवशी सामना संपला तेव्हादेखील गोलंदाजच वरचढ राहिले. मी न्यूलॅन्डस्च्या खेळपट्टीवर फलंदाजी केली आहे. येथे सामन्यादरम्यान फलंदाजांना काही काळ पूरक परिस्थिती मिळते. या वेळी मात्र फलंदाजांसाठी अनुकूल असे काहीही आढळले नाही.
अशाच काहीशा खेळपट्टीवर मी हेडिंग्लेत आणि वाँडरर्स येथेही खेळलो. त्या वेळी भारताने विजय मिळविला होता आणि गोलंदाजांनीच वर्चस्व गाजविले होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास पहिल्या सामन्यातील खेळपट्टी भारतीय फलंदाजांना भावली नाही. पहिल्या सामन्यात निकाल विरोधात गेला खरा; पण मालिकेतील अन्य सामन्यात परिस्थितीशी एकरूप होण्यास भारतीयांनी अधिक वेळ घेऊ नये.
अंतिम ११ खेळाडूंच्या संयोजनाबद्दल बरीच चर्चा गाजली. पाच गोलंदाजांसह खेळताना भारतीय संघाने अचूक संयोजन साधावे. कसोटी जिंकण्यासाठी धावांचा डोंगर उभारणे देखील गरजेचे असते. पाठोपाठ गडी बाद करण्यावर विजयाचे समीकरण ठरते. आपण विजयाचा विचार करण्यामागे देखील कारण आहे. आमचे गोलंदाज २० गडी बाद करू शकतात. हाच विचार पुढील दोन सामन्यांत विजय मिळविण्यास कारणीभूत ठरू शकतो.
हार्दिकने फलंदाजीत चुणूक दाखविलीच आहे. भारताने त्याला प्रोत्साहन द्यावे. पण संपूर्ण संघाच्या फलंदाजीच्या कामगिरीचे काय? प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. पराभवानंतर बाहेर बसलेल्या खेळाडूंच्या कर्तृत्वाचीही मोठी चर्चा होते. या वेळीही ती होत आहे. विराटने अशा बाबींबद्दल काळजी करू नये. अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल यांचा विदेशात फलंदाजीचा चांगला रेकॉर्ड असला तरी भारतीय संघ प्रत्येक सामन्यात खेळाडू बदलण्याचा विचार करू शकत नाही. पहिला सामना खेळलेल्या फलंदाजांवरच अधिक विश्वास दर्शवून दुसºया कसोटीला सामोरे जायला हवे. भारताला या मोसमात बरेच कसोटी सामने देशाबाहेर खेळायचे असल्याने संघ व्यवस्थापनाने खेळाडूंवर अधिक विश्वास टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. द. आफ्रिकेत आणखी दोन सामने आहेत. या दोन्ही सामन्यांचा निकाल लागेल, असा माझा विश्वास आहे. भारतीय खेळाडूंनी मैदानात संपूर्ण ताकदीनिशी लढत द्यावी, शिवाय आॅफ स्टम्पबाहेरच्या चेंडूला छेडण्याचा मुळीच प्रयत्न करू नये. (गेमप्लान)
Web Title: If you show faith in players, you can win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.