नवी दिल्ली : महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात (Womens T20 World Cup Final) ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी जिंकून सहावे विजेतेपद पटकावले. कांगारूच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. याशिवाय संघाची कर्णधार मेग लॅनिंग ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरली. तिच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 वे विजेतेपद जिंकले आणि रिकी पाँटिंग आणि महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले.
दरम्यान, विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाची सलामीवीर बेथ मुनीने एक मोठे वक्तव्य केले आहे. ट्वेंटी-20 विश्वचषक 2020 फायनल, राष्ट्रकुल स्पर्धा 2022 फायनल, ICC विश्वचषक 2022ची फायनल आणि आता महिला ट्वेंटी-20 विश्वचषक फायनल यासह प्रत्येक फायनलमध्ये मूनीने शानदार कामगिरी केली आहे. मोठ्या सामन्यांमध्ये चमत्कार कसे करायचे हे मुनीला चांगलेच माहीत आहे. मुनीने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 53 चेंडूत 74 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 156 पर्यंत नेली. परिणामी आफ्रिकेच्या संघाने हा सामना 19 धावांनी गमावला.
...तर आमच्यासोबत खेळू नये - मूनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपांत्य फेरीत भारतीय संघाने कडवे आव्हान दिले होते. तर आयर्लंडच्या संघाने सराव सामन्यात कांगारूला पराभवाची धूळ चारली होती. मात्र, निर्णायक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवून ट्रॉफीवर कब्जा केला. विजयानंतर पत्रकारांनी बेथ मुनीला ऑस्ट्रेलियाचा पराभव कसा करता येईल असे विचारले असता, मुनी म्हणाली, "फक्त समोर येऊ नका. ते खूप अवघड आहे. आमच्याशी खेळू नका."
"मी अनेक संघांसोबत खेळले आहे. पण आम्हाला कसे हरवले जाऊ शकते याचे उत्तर देणे खूप कठीण आहे. जर आम्ही खराब प्रदर्शन केले तर आमचा पराभव होईल. पण या खेळाचे वैशिष्ट्ये म्हणजे तो काळाबरोबर वेगाने पुढे जात राहतो. मी पुढील आव्हानासाठी खूप उत्सुक आहे. आमचा संघ अजिंक्य नाही. कारण जगातील इतर सर्व संघांना ऑस्ट्रेलियाला हरवायचे आहे. पण जेतेपदे जिंकताना ऑस्ट्रेलिया कधीच खचून जाणार नाही", असे मूनीने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"