नवी दिल्ली- आयुष्यात व्यक्तीला हवी असलेली गोष्ट मिळाली नसल्याने निराशा येते. या निराशेतून अनेकदा व्यक्ती आत्महत्येचा विचारही करतात. सर्वसामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रेटींनाही या परिस्थितीचा सामना करावा लागतो. टीम इंडियाचा बॉलर कुलदीप यादवनेही त्याच्या आयुष्यात असा प्रसंग आल्याचं म्हंटलं आहे. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात स्वतः कुलदीपने याबद्दलचा खुलासा केला आहे. आयुष्यात एकदा निराशा आल्याने आत्महत्येचा विचार केल्याचं कुलदीपने या कार्यक्रमात सांगितलं. 13 वर्षाचा असताना मला अंडर-15मध्ये खेळायची इच्छा होती. पण अंडर-15साठीच्या संघात माझं सिलेक्शन न झाल्याने मी निराश झालो होतो. त्यावेळी आत्महत्येचा पूर्ण विचार केला होता, असं कुलदीप या कार्यक्रमात म्हणाला.
अंडर-15मध्ये सिलेक्शन होण्यासाठी मी जीव तोडून मेहनत घेतली होती. पण तरीही सिलेक्शन न झाल्याने मी निराश झालो होतो. सिलेक्शन न झाल्याने मी इतका दुःखी झालो होती की आत्महत्या करायला मनाची तयारी केली होती. त्या दिवसांमध्ये माझ्या वडिलांची मला खूप साथ मिळाली. त्यांनी माझं मनोबल वाढवलं ज्यामुळे मी मेहनत करू शकलो.
फास्ट बॉलर बनण्याचं होतं कुलदीपचं स्वप्नशाळेत. कॉलेजमध्ये मी मजा-मस्ती म्हणून क्रिकेट खेळायचो. पण मी क्रिकेटमध्ये काही खास करावं, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. कुलदीप त्याच्या क्रिकेट करिअरचं पूर्ण श्रेय त्याच्या वडिलांना देतो. माझ्या वडिलांनी मी लहान असताना मला सरावासाठी प्रशिक्षकांकडे पाठवायला सुरूवात केली. सुरूवातीच्या दिवसात मी फास्ट बोलर बनायचं स्वप्न उराशी बाळगून ट्रेनिंग करत होतो. माझ्या प्रशिक्षकांनी माझ्या खेळाला बघून स्पिनची ट्रेनिंग दिली, असं कुलदीपने म्हंटलं.