नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल जखमी झाला. पायाच्या दुखापतीमुळे गिल इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला. यामुळे संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला ई-मेल पाठवीत दोन अतिरिक्त सलामीवीर पाठविण्याची मागणी केली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती मात्र कोहलीची ही मागणी पूर्ण करण्याच्या विचारात नाही.
पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या दोन सलामीच्या युवा फलंदाजांना खेळविण्याची संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. तथापि बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापनाने दोन नेमके कोणते खेळाडू हवेत, हे मात्र कळविलेले नाही. पृथ्वी आणि देवदत्त हे दोघेही श्रीलंका दौऱ्यावर आहेत.
ईश्वरनच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
निवड समितीने याआधीच पृथ्वीची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करायला हवी होती. अभिमन्यू ईश्वरन याला कुठल्या आधारे राखीव म्हणून स्थान देण्यात आले, याचे आश्चर्य वाटते. ईश्वरन याने प्रथमश्रेणी मोसमातही काही विशेष कामगिरी केली नाही. तांत्रिकदृष्ट्यादेखील तो कसोटी क्रिकेटसाठी फिट नाही. पृथ्वी हा अनेक बाबतीत ईश्वरनच्या तुलनेत फिट खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शॉने स्थानिक सामन्यात मात्र स्वत:चा खेळ उंचावला होता.
चेतन शर्मा बचावाच्या पवित्र्यात
निवड समितीने शॉ आणि पडिक्कल यांना इंग्लंडला पाठविलेच तर मात्र चेतन शर्मा यांच्यावर प्रश्नांचा भडिमार होऊ शकतो. त्यांनी ईश्वरनला राखीव निवडले कसे? याचे स्पष्टीकरण मागितले जाईल. नेमका याच गोष्टीचा बचाव करण्यासाठी चेतन शर्मा हे शॉ आणि पडिक्कल या दोघांना इंग्लंडला पाठविण्याच्या विचारात नाहीत, असे मानले जात आहे.
गांगुली, शाह हस्तक्षेप करणार
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानुसार चेतन शर्मा हे सध्यातरी शॉ आणि पडिक्कल यांना इंग्लंडमध्ये पाठविण्याच्या मूडमध्ये नाहीत. याच मुद्यावर संघ व्यवस्थापन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना विनंती करू शकते. जय शाह हे निवड समितीचे संयोजकदेखील आहेत. अद्याप शॉ आणि पडिक्कल यांची अधिकृत मागणी झालेली नाही. संघ व्यवस्थापनाचा दबाव कायम राहिला तर मात्र श्रीलंकेविरुद्ध मालिका आटोपल्यानंतर हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला जाऊ शकतील.
Web Title: Ignoring Kohli's demands No decision on sending two openers against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.