ILT20 स्पर्धेत रविवारी दुबई कॅपिटल्स आणि अबू धाबी नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात धावांचा अक्षरश: पाऊस पडला. फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळेच दुबई कॅपिटल्सने अबू धाबी नाईट रायडर्सला हरवून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत महापराक्रम रचला. महत्त्वाची बाब म्हणजे सामन्यात एकूण १५ षटकार आणि ४१ चौकारांची आतषबाजी झाली आणि तीन मोठे विक्रम मोडले गेले.
सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
दुबई कॅपिटल्सविरुद्ध अबू धाबी नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी केली. मधल्या फळीतील फलंदाज चरिथ असलंकाच्या ३८ चेंडूत केलेल्या ७८ धावांच्या बळावर अबू धाबी नाईट रायडर्स संघाने २० षटकांत ४ गडी गमावून २०३ धावा केल्या. अबू धाबी नाईट रायडर्स संघाने एकूण ८ षटकार आणि 22 चौकार लगावले. त्यापैकी ४ षटकार आणि ६ चौकार चरिथ असलंकाचे मारले. दुबई कॅपिटल्सने २०४ धावांचे आव्हान पार करताना तुफानी सुरुवात केली. ILT20 च्या इतिहासात इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग यापूर्वी कधीच झाला नव्हता. दुबई कॅपिटल्सने एक चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून शाय होप आणि गुलबदिन नइब या दोन खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संघाचाा विजय साकारला. शाय होपने ५३ चेंडूंत ७४ तर गुलबदिन नईबने ४७ चेंडूंत ८० धावा केल्या. सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुबई कॅपिटल्सने ७ षटकार आणि १९ चौकार मारले. त्यापैकी शाय होप आणि नईब जोडीने ६ षटकार आणि १३ चौकार मारले.
१५ षटकार, ४१ चौकार... तीन मोठे विक्रम मोडीत
सामन्यात एकूण १५ षटकार आणि ४१ चौकार मारले गेले आणि तीन विक्रम मोडले गेले. अबू धाबी नाइट रायडर्सने पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. दुसरा विक्रम होप आणि नईब यांचा होता. त्यांनी १३५ धावांची भागीदारी करून दुबई कॅपिटल्स संघासाठी सर्वात मोठी भागीदारी केली. तिसरा म्हणजे या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ४१० धावा केल्या. यापूर्वी एका सामन्यात सर्वाधिक ३६८ धावा झाल्या होत्या.
Web Title: ILT20 Gulbadin Naib Shai Hope star in Dubai Capitals record chase to beat Abu Dhabi Knight Riders 15 sixers 41 fours
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.