दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२० स्पर्धेत मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI Emirates संघाने विजयी सलामी दिली. एमआय एमिरेट्सने पहिल्याच सामन्यात शारजा वॉरियर्सवर विजय मिळवला अन् या विजयात पाकिस्तानात जन्मलेल्या महम्मद वसीम हिरो ठरला. त्याने ३९ चेंडूं ७१ धावांची खेळी करताना मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या एमआय एमिरेट्सला ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
अबुधाबीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२० च्या दुसऱ्या सामन्यात शारजाहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमआय एमिरेट्सकडून खेळणाऱ्या सलामीवीर महम्मद वसीमने याचा फायदा घेतला. वसीमने सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करत ३९ चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह ७१ धावांची दमदार खेळी केली. वसीमशिवाय यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरननेही ३० चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह ४९ धावांची खेळी केली. त्यामुळे किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली एमआय एमिरेट्सने ५ गडी गमावून २०४ धावा केल्या.
२०५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना शारजा संघाचे फलंदाज एमआयच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्याच्याकडून केवळ इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सला २९ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांसह ६२ धावा करता आल्या. याशिवाय रहमानउल्ला गुरबाजनेही सलामी करताना ३१ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. मात्र, या दोघांशिवाय बाकीचे फलंदाज काहीही करू शकले नाहीत, त्यामुळे मोईन अलीच्या नेतृत्वाखालील शारजाहला २० षटकांत ९ गडी बाद १५५ धावाच करता आल्या आणि त्यांना ४९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी एमआयकडून इम्रान ताहिरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
महम्मद वसीम UAE संघासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो पण त्याचा जन्म 12 फेब्रुवारी 1994 रोजी पाकिस्तानमध्ये झाला. त्यानंतर 2021 मध्ये त्याने पाकिस्तान सोडला आणि UAE संघासोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वसीमने आतापर्यंत यूएईसाठी 20 टी-20 सामन्यांमध्ये 743 धावा केल्या आहेत