Join us  

आयुष्यभर करावा लागला रंगभेदाचा सामना, भारताचे माजी फिरकीपटू एल. शिवरामकृष्णन यांचा धक्कादायक दावा

L. Shivaramkrishnan : भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आरोप लावला आहे की, त्यांना आयुष्यभर त्यांच्या रंगामुळे हीन वागणूक मिळाली. केवळ परदेशातच नाही तर भारतातसुद्धा त्यांना रंगभेदाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 6:10 AM

Open in App

कानपूर : भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आरोप लावला आहे की, त्यांना आयुष्यभर त्यांच्या रंगामुळे हीन वागणूक मिळाली. केवळ परदेशातच नाही तर भारतातसुद्धा त्यांना रंगभेदाचा सामना करावा लागला. शिवरामकृष्णन यांनी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

इंग्लंड क्रिकेटला हरवणाऱ्या रंगभेद प्रकरणासंदर्भात बोलताना त्यांनी स्वत:चा अनुभव सांगितला. ट्विटर टाकलेल्या एका पोस्टमध्ये शिवरामकृष्णन म्हणाले, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या रंगामुळे भेदभाव आणि टीकेचा सामना केला आहे. माझ्या देशातूनही ही वागणूक मिळाली याचे मला अतीव दु:ख आहे. रंगभेदाचा सामना करावा लागणारे शिवरामकृष्णन हे काही पहिलेच भारतीय नाहीत. याआधी तामिळनाडूचा सलामीचा फलंदाज अभिनव मुकुंदनेही २०१७ साली समाजमाध्यंमावर या मुद्यावर भाष्य केले होते. भारताकडून सात कसोटी सामने खेळणाऱ्या मुकुंदने तेव्हा म्हटले होते, की मी १५ वर्षांपासून देशाअंतर्गत आणि देशाबाहेर प्रवास केलेला आहे. यावेळी माझ्या त्वचेच्या रंगावरून मला हिणवल्या गेले आहे. नेहमीच मला या समस्येचा सामना करावा लागला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाला याची जाण असायला हवी की, पूर्ण दिवस सराव करावा लागत असल्याने आणि भर उन्हात सामने खेळावे लागत असल्याने त्वचा टॅन होणारच. मात्र, मला माझ्या रंगाचे कुठलेही दु:ख नाही.

पुढे तो म्हणाला, मला माझ्या रंगाचा अभिमान यासाठी आहे कारण तो रंग ज्या गोष्टीमुळे झाला आहे ती माझी आवडती गोष्ट आहे. तासनतास भर उन्हात सराव केल्याने मी माझी उद्दिष्टे गाठू शकलो. चेन्नई हे भारतातील उष्ण शहरांपैकी एक शहर असल्याने त्याचा माझ्यावर परिणाम होणारच.  मागच्या वर्षी डोडो गणेश या भारतीय माजी खेळाडूनेही रंगभेदाचा सामना करावा लागल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतबीसीसीआय
Open in App