Join us  

मी शंभर टक्के फिट नाही, पण खेळण्यास सज्ज : मिचेल स्टार्क

इंदूर : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा जखमेतून १०० टक्के सावरलेला नाही. पण, बुधवारी भारताविरुद्ध सुरू होत असलेल्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 5:41 AM

Open in App

इंदूर : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा जखमेतून १०० टक्के सावरलेला नाही. पण, बुधवारी भारताविरुद्ध सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत प्रभावी कामगिरी करण्यास सज्ज आहे.

नियमित कर्णधार पॅट कमिन्स आई आजारी असल्याने मायदेशात परत गेला. त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला स्टार्ककडून बऱ्याच अपेक्षा आहेत. भारताच्या फिरकी गोलंदाजांसह वेगवान गोलंदाजांनीही या मालिकेत प्रभावी मारा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा सराव सुरू होण्याआधी स्टार्क म्हणाला, ‘मला आता ताजेतवाने वाटते. काही वेळातच मी १०० टक्के कामगिरी करण्यास सज्ज होणार आहे. मी पूर्ण ताकदीनिशी मारा करीत असून, हातातून चेंडूदेखील योग्यरीत्या सुटत आहे.’

तासभर सरावात सहभागी झाल्यानंतर हा डावखुरा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, ‘हा दौरा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.  फिरकीपटूंनी मोठी भूमिका बजावली; तरीही भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली. चेंडू रिव्हर्स होत असेल तर भारतीय गोलंदाज यष्टीला लक्ष्य बनवतात. तिसऱ्या कसोटीतही फिरकीची भूमिका निर्णायक ठरेल यात शंका नाही. मात्र, २० बळींसाठी मला फिरकीपटूंची मदत करावीच लागेल.’

तिसऱ्या कसोटीत स्टार्क आणि ग्रीन वेगवान गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पर्याय असतील. ऑस्ट्रेलियासाठी ७५ कसोटी सामने खेळलेल्या ३३ वर्षांच्या स्टार्कने उपखंडात खेळण्याच्या अनुभवाचा मला लाभ होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे.तो म्हणाला, ‘जखमेमुळे ८-१० दिवसांचा ब्रेक घेतला. आता पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी करीत आहे. वर्कलोड आणि शारीरिक ताण यांची चिंता नाही. अलीकडे पाकिस्तान आणि श्रीलंकेतील यशस्वी कामगिरीचादेखील येथे लाभ मिळू शकतो.’

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App