पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम ( Wasim Akram) यानं पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यास स्पष्ट नकार दिला. हे काम यशस्वी करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि देशात क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे व ते कधीकधी गैरवर्तवणुक करतात. पण, त्यानं पाकिस्तानी खेळाडू व युवकांना मदत करण्यासाठी नेहमी उपलब्ध असल्याचे सांगितले. अक्रमनं पाकिस्तानकडून कसोटीत ४१४ व वन डे त ५०२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं १९९६, १९९९ आणि २००३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तो काही काळ पाकिस्तानचा कर्णधारही होता.
वसीम अक्रम यांनी एका मुलाखतीत सांगितलं की,''तुम्ही जेव्हा एखाद्या संघाचे प्रशिक्षक बनता तेव्हा तुम्हाला संघाला २०० ते २५० दिवस द्यावे लागतात. हा खूप दीर्घ कालावधी असतो. पाकिस्तान आणि माझ्या कुटुंबीयांपासून मी एवढे दिवस लांब राहू शकत नाही. पाकिस्तान सुपर लीगच्या निमित्तानं खेळाडूंशी गप्पा होतात आणि त्या सर्वांकडे माझा नंबर आहे.'' पाकिस्तानी संघाचे चाहते आणि फॉलोअर्स खूप गैरवर्तवणुक करतात आणि त्यामुळेच संघाचे प्रशिक्षकपद नको, असे स्पष्ट मत अक्रमनं व्यक्त केलं.
तो म्हणाला,'' मी मुर्ख नाही. संघाचा प्रशिक्षक व वरिष्ठ खेळाडूंसोबत गैरवर्तन होते आणि ते मी पाहतो व ऐकतो. क्रिकेटच्या मैदानावर प्रशिक्षक खेळत नाही. ते खेळाडूंचे काम असते. प्रशिक्षक फक्त रणनीती आखण्यास मदत करतो. त्यामुळे संघाच्या पराभवाला त्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे. मला या सर्व गोष्टींची भीती वाटते. मी स्वतःसोबत कोणतीही गैरवर्तन खपवून घेऊ शकत नाही. ''