नागपूर : रणजी करंडकाच्या सध्याच्या सत्रात चौथे आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाच शतके अशी एकूण नऊ शतके झळकवून विदर्भाला तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकून देण्याच्या दिशेने नेणारा नाबाद शतकवीर करुण नायर याने केरळविरुद्ध फायनलच्या चौथ्या दिवशी शनिवारी २८० चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकल्या.
चांगला खेळ करणे माझ्या हातात; पण..
व्हीसीए जामठा स्टेडिमवर चौथ्या दिवसअखेर करुणने माध्यमांशी संवाद साधला. ८६० धावा ठोकल्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमनाची आशा आहे काय, असा प्रश्न विचारताच ३३ वर्षांचा अनुभवी फलंदाज म्हणाला, 'चांगला खेळ करणे माझ्या हातात आहे. मला राष्ट्रीय संघात स्थान द्यायचे की नाही हे निवड समिती ठरवेल. माझ्यात असलेले कौशल्य पणाला लावून खेळत आहे. विक्रमासाठी खेळण्याचे माझ्या डोक्यात कधीही नसते. रविवारी अखेरच्या दिवशीही २०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी नव्हे तर संघाची गरज ओळखून खेळणार आहे.'
या गोष्टीचा आनंद
दोन सत्रात यशस्वी फलंदाजीनंतर पुन्हा विदर्भाकडून खेळत राहणार का, असे विचारताच नायर म्हणाला, 'विदर्भाकडून खेळणे माझ्यासाठी विशेष ठरले. पुढेही संधी मिळाल्यास मी खेळत राहणार आहे. विदर्भाला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देण्यात आपलेही योगदान राहणार असल्याचा आनंद वाटतो.' विदर्भात प्रतिभावान खेळाडूंची मोठी फळी असल्याने या क्षेत्रातील क्रिकेटपटू भविष्यात मोठी झेप घेतील, असा विश्वास करुणने व्यक्त केला.