T20 World Cup 2024 : पाकिस्तानचे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील आव्हान संपुष्टात आले. आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला अन् पाकिस्तान वाहून गेला. सातत्याने होत असलेला पराभव पाकिस्तानच्या चाहत्यांसह माजी खेळाडूंच्या जिव्हारी लागला. अनेकांनी बाबर आझमच्या संघावर बोचरी टीका केली. अमेरिका आणि भारत यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर शेजाऱ्यांनी कॅनडाविरूद्ध विजय मिळवला. मात्र, त्यांना सुपर-८ ची फेरी गाठता आली नाही. भारताविरूद्ध माफक १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला घाम फुटला.
स्पर्धेबाहेर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पाकिस्तानचा अष्टपैलू इमाद वसीमने सांगितले की, जे काय व्हायचे होते ते झाले आहे. यात आपण काहीच बदल करू शकत नाही. अनेकजण मला मी केलेल्या विश्लेषणाबद्दल विचारत आहेत. त्यांनी मी हेच सांगेन की मी केवळ क्रिकेटबद्दल बोललो आहे. क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलताना मी टीका केली. पण कोणावरही माझा वैयक्तिक राग नव्हता.
पाकिस्तान स्पर्धेबाहेर तसेच साखळी फेरीत आम्हाला दोन सामने गमवावे लागले. हे खूपच निराशाजनक आहे. चाहत्यांपेक्षा आम्ही खूप निराश आहोत. मी मान्य करतो आणि पाकिस्तानातील नागरिकांना सांगतो की, आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. पण, एक गोष्ट सांगतो की, आम्ही देखील माणसं आहोत, आमच्याकडूनही चूक होऊ शकते आणि याचे दु:ख आम्हाला पण आहे, असेही इमाद वसीमने नमूद केले.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला यजमान अमेरिकेने नमवले. मग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शेजाऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. तिसरा सामना जिंकण्यात पाकिस्तानला यश आले पण सुपर-८ ची फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. अ गटातून भारत आणि अमेरिका या संघांनी सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शेजाऱ्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.