नॉटिंगहॅम, इंग्लंड वि. पाकिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वन डे मालिकेत पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आणि त्याला सामन्यातून माघार घ्यावी लागली. दुखापत गंभीर असल्यास त्याला आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागू शकते आणि पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल.
इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत इमामने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या दोन वन डेत नाबाद 42 व 35 धावा केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात त्याने 151 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याने 131 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकार खेचला. इमामने 151 धावांची खेळी साकारताना भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांचा विश्वचषकातील विक्रम मोडीत काढला होता.
कपिल देव यांनी 1983 साली झालेल्या विश्वचषकात कपिल यांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात नाबाद 175 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. त्यावेळी कपिल यांचे वय 24 वर्षे होते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इमामने 151 धावांची खेळी साकारली. त्याचे वय 23 वर्षे आहे. त्यामुळे दीडशतकी खेळी साकारणारा सर्वात युवा खेळाडू इमाम ठरला आहे.
त्यामुळे त्याचे संघात असणे पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे आहे. चौथ्या वन डे सामन्याच्या चौथ्या षटकात इमामला ही दुखापत झाली. मार्क वूडच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगला फटका मारताना इमामच्या कोपऱ्याला ही दुखापत झाली. त्यानंतर तो वेदनेने मैदानावर विव्हळत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.