India vs South Africa 3rd Test: विराट कोहलीचा आक्रमक स्वभाव चाहत्यांसाठी काही नवीन नाही. मैदानावर विराटच्या आक्रमक स्वभावाची वेळोवेळी साऱ्यांना प्रचिती आली आहे. त्यातच आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या कसोटीत असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर पायचीत झाला. पण DRS मध्ये त्याला नाबाद ठरवण्यात आले. चेंडूचा बाऊन्स हा मुद्दा भारतीय खेळाडूंना पटला नाही. त्यामुळे विराटसह सारेच नाराज झाले. यावेळी विराटने स्टंप माईकच्या जवळ जात काही वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याच मुद्द्यावरून गौतम गंभीरने विराटवर टीका केली.
"विराट कोहली हा अपरिपक्व खेळाडू आहे. भारतीय कर्णधाराने अशा प्रकारे स्टंप माईकशी बोलणं खूपच विचित्र आणि चुकीचं आहे. असे चाळे करून तुम्ही कधीच युवा पिढीचे आदर्श बनू शकत नाही. पहिल्या डावात विराटला स्वत:ला DRS मध्ये नाबाद ठरवण्यात आले. त्यावेळी तो ५०-५० टक्क्याचा भाग होता. पण तेव्हा विराट शांत राहिला. मयंक अग्रवालच्या बाबतीतही विराट गप्प राहिला. पण यावेळी त्याने प्रतिक्रिया दिली. मला असं वाटतं की या मुद्द्यावर राहुल द्रविडने विराट कोहलीशी नक्कीच चर्चा केली पाहिजे", असं गौतम गंभीर म्हणाला.
नक्की काय घडलं?
अश्विनच्या गोलंदाजीवर डीन एल्गर पायचीत झाला. त्यावेळी DRSमध्ये मात्र त्याला नाबाद ठरवण्यात आले. चेंडूची उसळी जास्त असल्याचं हॉक आय़ टेक्नॉलॉजीमध्ये दिसलं. पण मूळ चेंडू पाहता इतकी उसळी शक्य नसल्याचं मत भारतीय खेळाडूंनी व्यक्त केलं. पंचदेखील चेंडूचा बाऊन्स पाहून थोडेसे अचंबित झाले. त्यावेळी लोकेश राहुल, अश्विन आणि विराटने स्टंप माईकशी जाऊन काही वादग्रस्त विधानं केली. अख्खा देश ११ खेळाडूंविरोधात खेळतोय, असं विधान एकाने केलं. तर स्वत:च्या टीमच्या कृत्यांवर लक्ष ठेवा. फक्त विरोधी संघाच्या खेळाडूंवर लक्ष ठेवू नका', असं वक्तव्य विराटने केलं. या प्रकारानंतर अनेकांनी विराटवर टीकाही केली.