मुंबई : आयपीएलमध्ये इम्पॅक्ट खेळाडूचा नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला असल्याचे सांगून हितधारकांचे मत विचारात घेऊन त्यावर फेरविचारही होऊ शकतो, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी सांगितले. या नियमामुळे यंदाच्या सत्रात आठवेळा २५० हून अधिक धावांची नोंद झाली.
खेळाडू, प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या मते या नियमाचा गोलंदाजांना फटका बसत आहे. संघाला यामुळे अतिरिक्त फलंदाज उपलब्ध होतो. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मते, अष्टपैलूंना यामुळे गोलंदाजी करण्याची संधीही मिळत नाही.
शाह यांनी सांगितले की, ‘हा नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला होता. या नियमामुळे दोन भारतीय खेळाडूंना खेळण्याचा अतिरिक्त लाभ होतो हे महत्त्वाचे नाही का? खेळात चुरस निर्माण होत आहे. खेळाडूंना वाटत असेल की हा अन्याय आहे तर याविषयी हितधारकांशी चर्चा करू. अद्याप कुणीही हरकत घेतलेली नाही. बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. हा स्थायी नियम नाही, शिवाय हा नियम संपवू असेही माझे मत नाही. खेळाडू, संघ मालक आणि प्रसारक यांचे मत विचारात घेतले जाईल.’