Join us  

२०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या रणनीतीचा माही महत्त्वपूर्ण भाग - रवी शास्त्री

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबाबत सुरू असलेल्या चर्वितचर्वणला स्वल्पविराम दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:21 AM

Open in App

कोलंबो : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबाबत सुरू असलेल्या चर्वितचर्वणला स्वल्पविराम दिला आहे. शास्त्री यांनी धोनीची प्रशंसा करताना त्याच्यात अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे संकेत देताना तो अद्याप अर्ध्यावरही आलेला नसल्याचे म्हटले आहे. इंग्लंडमध्ये २०१९ ला होणाºया विश्वकप स्पर्धेच्या रणनीतीचा तो भाग असल्याचे शास्त्री यांनी म्हटले आहे.श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या वन-डे मालिकेत धोनी सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्याने गेल्या तीन डावांमध्ये नाबाद ४५, ६७ आणि ४९ धावांच्या खेळी केल्या आहेत. त्यातील एक खेळी गुरुवारी कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळताना केलेली आहे.२०१९ च्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत असून ३६ वर्षीय धोनी रणनीतीचा भाग आहे, असे शास्त्री म्हणाले.महेंद्रसिंग धोनीचा संघावर मोठा प्रभाव आहे. तो ड्रेसिंग रुममध्ये लिजेंड असून खेळातील महत्त्वाचे रत्न आहे. तो अद्याप संपलेला नसून तो अर्ध्यावरही आलेला नाही. धोनी संपला असा जर कुणी विचार करीत असतील तर ते चूक करीत आहेत. त्यांना त्याची लवकरच प्रचिती येईल. या अनुभवी खेळाडूमध्ये बरेच क्रिकेट शिल्लक आहे, असेही शास्त्री म्हणाले.धोनी देशातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. खेळाडूची निवड करताना कुठले निकष लावले जातात. खेळाडू सर्वोत्तम असावा, हा महत्त्वाचा निकष आहे आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनी सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. त्याच्या फलंदाजीच्या आकडेवारीचा विचार करू नका. तुम्हाला आणखी काय हवे. केवळ तो अनेक वर्षे देशातर्फे खेळला म्हणून त्याच्या पर्यायाबाबत विचार करायचा का, असा सवालही शास्त्री यांनी यावेळी केला.शास्त्री पुढे म्हणाले,‘तो देशातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे. सुनील गावस्कर ३६ वर्षांचे असताना किंवा सचिन तेंडुलकर ३६ वर्षांचा असताना त्यांना बदलण्याबाबत विचार केला होता का? धोनी सध्या सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्याच्या पर्यायाबाबत चर्चा करण्याची गरज नाही. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेपर्यंत जवळजवळ ४० सामने खेळणार आहे. त्यामुळे विविध प्रयोग करणे आणि रोटेशन या रणनीतीचा वापर करण्यात येणार आहे. निवड समितीने खेळाडूंच्या निवडीसाठी फिटनेस हा निकष महत्त्वाचा ठरविला आहे आणि त्यांच्या निर्णयाला समर्थन आहे. वन-डे क्रिकेटमध्ये प्रयोग करताना जय-पराजयाचा विचार नसतो. आपण विजयासाठीच खेळतो, पण आम्ही सर्वोत्तम संतुलन साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. विश्वकप स्पर्धेला अद्याप बराच कालावधी शिल्लक असून आम्ही एकावेळी एकाच मालिकेबाबत विचार करतो.’ (वृत्तसंस्था)फिटनेस या मुद्यावर कसल्याच प्रकारची तडजोड करणार नाही. मैदानात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहिजे. त्यामुळे फिटनेस महत्त्वाचा ठरतो. फिटनेससाठी काही निकष ठरविण्यात आले आहे. निवड प्रकियेमध्ये सहभागी होण्याची माझी जबाबदारी नाही. कारण माझ्या खेळाडूंचा माझ्यावर विश्वास असायला हवा. संघाची निवड करण्याचे काम निवड समितीचे आहे. ते अधिक क्रिकेट बघतात. जर कुणी फॉर्म, फिटनेस या निकषामध्ये बसत असेल तर तो निवडसाठी पात्र असेल, असेही शास्त्री यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :क्रिकेटएम. एस. धोनीरवी शास्त्री