सिडनी : ‘स्विच हिट’ फटक्याला अवैध ठरविणे अव्यावहारिक आहे कारण मैदानावरील पंचांसाठी फलंदाजांच्या ‘ग्रिप’ व ‘टान्स’मधील बदलावर नजर ठेवणे शक्य नाही, असे मत सायमन टोफेल यांनी व्यक्त केले. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने आयसीसीने ‘स्विच हिट’वर बंदी आणायला हवी कारण हे गोलंदाज व क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले आहे.
आयसीसी एलिट पॅनलचे माजी पंच टोफेल म्हणाले, ‘क्रिकेटचा खेळ शास्त्र नाही, कौशल्य आहे. आपण परफेक्ट नाही. जर आपण म्हटले की अशा प्रकारच्या फटक्यावर बंदी घालायला हवी तर अम्पायर यावर नजर कसे ठेवतील.’ सलग पाचवेळा आयसीसीचे सर्वोत्तम पंच ठरलेले टोफेल म्हणाले, ‘अम्पायरला अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यात फ्रंट फुट, बॅक फुट, सुरक्षित स्थान आणि चेंडू कुठे पडला आदींचा समावेश आहे. एका अम्पायरसाठी ग्रिप व टान्सवर नजर ठेवणे अशक्य आहे. जो लागू करता येणार नाही असा कायदा करण्यात काही अर्थ नाही.’ ‘स्विच हिट’मध्ये गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर फलंदाज आपली ग्रिप बदलतो. ऑस्ट्रेलियन फलंदाज हे सहजपणे करतात.