कराची : पाकिस्तान सुपर लीगचे सामने बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी स्टेडियममधून चक्क सीसीटीव्ही कॅमेरे, बॅटरी आणि फायबर केबलसारख्या महागड्या वस्तू चोरून नेल्या. या प्रकरणामुळे नामुष्की सहन कराव्या लागलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा स्थगित करण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. आतापर्यंत पीएसएलमध्ये एकूण १३ सामने खेळविले गेले आहेत.
सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने यातून सावरण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. मात्र, दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच खराब होत आहे. त्यामुळे कंगाल होत चाललेल्या पाकच्या नागरिकांनी सीसीटीव्ही आणि बॅटरी चोरून नेण्याचा प्रताप केला. सुरक्षा खर्च वाहण्याची पंजाब प्रातांची ताकद नसल्याने पीएसएलचे सामने केवळ कराचीत खेळविण्याची मागणी सुरू आहे. सध्या हे सामने मुल्तान, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये खेळविले जात आहेत.
पण या चोरींच्या प्रकरणांमुळे स्पर्धेच्या आयोजकांपुढील आर्थिक समस्येत भरच पडली असून, यावर निपटारा शोधण्यासाठी विविध उपायांचा विचार केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यावेळी प्रेक्षकांनी जे हाती लागेल त्या वस्तू घरी नेल्या. यामध्ये केबल्स, बॅटरी आणि कॅमेऱ्यासारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे.
सुरक्षेवरून उठले वादंगपंजाब प्रांताच्या सरकारने सुरक्षा देण्यासंदर्भात हात वर केले आहेत. कारण त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे सुरक्षा पुरविण्यासाठी ४५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, पीसीबीने त्यात असमर्थता दाखविली. त्यानंतर पीसीबी आणि पीएसएल फ्रँचायझींमध्ये या संदर्भात एक बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत सर्व सामने कराचीला खेळविले जाण्यावर चर्चा करण्यात आली.