मतीन खान, स्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह
हा मथळा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. अमिताभ हे महानायक! त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी दिली. ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख लाभलेल्या अमितजींचा चित्रपटसृष्टीतील प्रवास ५३ वर्षांचा आहे. मी येथे चित्रपटाची चर्चा करीत नसून क्रिकेटची चर्चा करीत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पाकिस्तान क्रिकेटचे ‘अमिताभ बच्चन’ अर्थात इम्रान खान यांचे अस्तित्व नाकारले. तेथील सत्ताधाऱ्यांनी वाईट राजकारणामुळे इम्रानसारख्या महानायकाला बेदखल केले. यामुळे क्रिकेटपटू या नात्याने इम्रान यांची उंची कमी होणार नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात अधिक वाढेल. पीसीबीची प्रतिष्ठा मात्र रसातळाला जाईल.
झाले असे की, पाकने १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिवस साजरा केला. याप्रसंगी पीसीबीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात १९५२ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या क्रिकेटचा इतिहास दाखविण्यात आला. या व्हिडीओतून इम्रान खान ‘गायब’ आहेत. त्यांना पुसट स्वरूपात दाखविण्यात आले आहे.
आपल्या काळातील महान अष्टपैलू इम्रान यांनी पाकला स्वबळावर अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. हे तेच कर्णधार आहेत, ज्यांनी पाकिस्तान क्रिकेटला सर्वांत गौरवशाली क्षणांचे भागीदार केले.
१९९२ चा विश्वचषक ज्यांनी पाहिला असेल, सध्याच्या पिढीतील ज्यांनी ते व्हिडीओ पाहिले असतील त्यांच्या लक्षात येईल की इम्रान यांनी स्वत:च्या खांद्यावर पाकिस्तान क्रिकेटची पताका घेत संघाला ‘चॅम्पियन’ बनविले. पाक संघ इंग्लंडविरुद्ध साखळी सामन्यात ७४ धावांत गारद झाला होता. भाग्याने साथ दिली अन् पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही. यामुळे उभय संघांत गुणविभागणी झाली. पाकचा संघ स्पर्धेबाहेर होण्यापासून बचावला. संघाचा पुढील प्रवास सुरू होताच इम्रान यांनी कर्णधाराची जबाबदारी सांभाळून पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून दिले.
पीसीबीचे दुर्दैव असे की क्रिकेट बोर्ड सरकारच्या हातचे बाहुले आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशांनी याचा विचार केला पाहिजे की देशासाठी गौरवशाली इतिहास घडविणाऱ्या खेळांना राजकारणापासून अलिप्त ठेवायला हवे. खेळाडूंचा सन्मान जपला पाहिजे, पण राजकारणात सत्य कसे आणि कधी लपविले जाईल, याचा भरवसा नसतो. त्यामुळेच, मुनव्वर राणा यांच्या या ओळी तंतोतंत खऱ्या ठरतात.... ‘सियासत किस हुनरमंदी से सच्चाई छुपाती है कि, जैसे सिसकियों के जख्म शहनाई छुपाती है!’