मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इम्रान खान हे दहशतवादी आणि पाकिस्तनच्या हातातील कळसूत्रीचे बाहुले आहे, अशी जहरी टीका कैफने केली आहे.
कैफने रविवारी एका लेखावर आपले मत मांडताना एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कैफने इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये कैने म्हटले आहे की, " पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आहे. इम्रान खान तुम्ही एक महान क्रिकेटपटू होतात, पण सध्याच्या घडीला तुम्ही दहशतवादी आणि पाकिस्तानच्या आर्मीच्या हातातील बाहुले झालेले आहात. तुम्ही स्वत:ची छबी खराब करत आहात."
संयुक्त राष्ट्रांमध्ये इम्रान यांनी काही दिवसांपूर्वी एक भाषण दिले होते. या भाषणानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनी इम्रान यांच्यावर जोरदार टीका केली होती. सेहवागने आपल्या ट्विटरवर इम्रान यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक टीव्ही अँकर इम्रान यांच्यावर टीका करत होती.