पाकिस्तानचा माजी गोलंदाज सर्फराज नवाझ यानं पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या मुलाखतीत त्यानं हा दावा केला. इम्रान त्यांच्या घरी चरसचे सेवन करायचा आणि कोकेनचही सेवन करायचा असा नवाझनं दावा केला. १९७०-८०च्या कालावधीत नवाझ आणि इम्रान यांनी पाकिस्तानी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. नवाझनं १९८७च्या दौऱ्याबाबत सांगताना हा प्रसंग घडल्याचे सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत इम्रानला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर इस्लामाबाद येथे परतल्यानंतर इम्राननं नवाझच्या घरी आला आणि ड्रग्सचं सेवन केले, असा दावा नवाझनं केला.
''त्यानं आणखी काहीतरी सेवन केलं होतं. लंडनमध्ये असताना तो कॅनाबीसचं सेवन करायचा आणि माझ्या घरीही. १९८७साली इंग्लंडविरुद्ध इम्रानला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तेव्हा तो माझ्या घरी आला आणि त्याच्यासोबत मोहसीन खान, अब्दुल कादीर, सलिम मलिक हेही होते आणि त्यानं चरसचं सेवन केलं. लंडनमध्ये असतानाही त्यानं कोकेनचं सेवन केलं होतं, ''असे नवाझनं सांगितले.
''त्याला माझ्यासमोर आणा आणि पाहा तो हे वृत्त फेटाळतो का. या घटनेचा मी एकटा साक्षीदार नाही, लंडनमध्ये अनेक जण होते,''असेही तो म्हणाला.