इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक ( Harry Brook ) याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल २०२४ मधून माघार घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी रुपयांना त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याने माघार घेण्यामागचं कारण सोशल मीडियावर एक पत्र लिहून सांगितले आणि ते भावनिक पत्र वाचून चाहते हळहळले...
इंग्लंडचा स्टार खेळाडू हॅरी ब्रूकने आयपीएल २०२४ मधून नाव मागे घेतल्यानंतर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये ब्रूकने लिहिले की, ''मी सांगू इच्छितो की मी आगामी आयपीएलमध्ये न खेळण्याचा खूप कठीण निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने निवड केल्याबद्दल मी खूप उत्साहित होतो आणि सर्वांसोबत खेळण्यास उत्सुक होतो. या निर्णयामागील माझी वैयक्तिक कारणे सांगण्याची गरज वाटत नसली तरी, मला माहित आहे की बरेच जण का विचारतील. त्यामुळे मला ते शेअर करायचे आहे.''
तो म्हणाला, 'गेल्या महिन्यात माझ्या आजीचे निधन झाले. ती माझ्यामागे खंबीरपणे उभी होती. माझ्या बालपणीचा बराच काळ मी त्यांच्या घरात घालवला. माझे क्रिकेटवरील प्रेम आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात माझ्या आजोबांचा आणि आजीचा मोठा वाटा आहे. जेव्हा मी घरी असायचो तेव्हा क्वचितच असा एक दिवस असेल ज्यात मी त्यांना भेटलो नाही. तिला मला इंग्लंडसाठी क्रिकेट खेळताना बघायला मिळाले याचा मला खूप आनंद आहे. गेल्या काही वर्षांत जिंकलेले काही पुरस्कार ती पाहू शकली, याचा मला अभिमान आहे.''