नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी एक आघाडीचा खेळाडू ऑस्ट्रेलियन संघातून बाहेर पडला आहे. दरम्यान, या खेळाडूच्या जागी बदली खेळाडूचीही घोषणा झाली आहे. हा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियन संघात दाखल होईल.
ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्वॅपसन बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. मिचेल स्वॅपसन हा त्याच्या पत्नीच्या बाळंतपणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये परतत आहे. मिचेल स्वॅपसनच्या जागी मॅथ्यू कुन्हमेन याला संघात स्थान देण्यात आले आहे. मॅथ्यू कुन्हमेन याने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
मिसेल स्वॅपसन याचा पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला नव्हता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धांवांनी पराभूत व्हावे लागले होते. मिचेल स्वॅपसन हा त्याची गर्भवती असलेली पत्नी जेस हिच्यासोबत राहण्यासाठी ब्रिस्बेन येथे परतत आहे.
२६ वर्षीय मॅथ्यू कुन्हमेन याने गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५.०२ च्या इकॉनॉमी रेटने धावा देत ६ विकेट्स मिळवले आहेत. तसेच त्याने आतापर्यंत १२ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३२ बळी टिपले आहेत.