BAN-W vs IND-W 2023 : भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पराभव करून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात यजमान संघाने ऐतिहासिक विजय मिळवत विजयी सलामी दिली होती. त्यामुळे आजचा सामना भारतीय संघासाठी 'करा किंवा मरा' असाच होता. महत्त्वाच्या सामन्यात भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने अष्टपैलू खेळी केली. तिने ८६ धावांसह ४ बळी घेत यजमानांना पराभवाची धूळ चारली.
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर स्मृती मानधनाने (३६) धावा करून साजेशी सुरूवात केली. पण प्रिया पुनियाच्या (७) रूपात भारताला पहिला झटका बसला. त्यानंतर यास्तिका भाटियाने (१५) डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तिलाही अपयश आले. पण हरमनप्रीत कौर (५२) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (८६) यांच्या अप्रतिम खेळीने भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारली. याशिवाय हरलीन देओलने २५ धावांची खेळी करून भारताची धावसंख्या २२८ धावांपर्यंत पोहचवली. अखेर ५० षटकांत भारताने ८ बाद २२८ धावा केल्या.
२२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाला घाम फुटला. फरझाना होक (४७) वगळता एकाही बांगलादेशी फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. आपल्या फलंदाजीने यजमान संघाच्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या जेमिमाने गोलंदाजीत देखील कमाल केली. तिने ३.१ षटकांत सर्वाधिक ४ बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर देविका वैद्य (३), मेघना सिंग, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
भारताचा मोठा विजय भारतीय संघाने सांघिक खेळी करत सामना जिंकला अन् मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अष्टपैलू खेळीमुळे जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बांगलादेशचा संपूर्ण संघ ३५.१ षटकांत १२० धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने १०८ धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे शनिवारी होणारा अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.