Join us  

"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली

Sachin Tendulkar Rohit Sharma Virat Kohli on Ratan Tata Demise: कर्णधार रोहित शर्मा आणि रनमशिन विराट कोहलीनेही व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:26 PM

Open in App

Sachin Tendulkar Rohit Sharma Virat Kohli on Ratan Tata Demise: टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून कुलाबाच्या घरी नेण्यात आले. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशासह जगभरातून सामान्यांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून टाटा यांना आदरांजली अर्पण केली.

"रतन टाटा यांनी आपल्या जीवनकाळात देशाला प्रगतीपथावर नेलेच, पण मृत्यूनंतरही त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशाला हादरून सोडले. मला टाटा यांच्यासोबत वेळ घालवता आला हे मी माझे भाग्यच समजतो. पण ज्यांना आयुष्यात टाटा यांना भेटता आले नाही त्यांच्या मनात आज तितकेच दु:ख आहे, जेवढे दु:ख माझ्या मनात आहे. हा टाटा यांच्या कार्याचा परिणाम होता. त्यांनी साऱ्यांना दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण अशा लोकांची काळजी घेतो ज्यांच्याकडे स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेशी साधने नसतात. टाटांनी आपल्या जीवनात प्राण्यांवरील प्रेमापासून ते परोपकारापर्यंत सर्व सामाजिक जाणीवा जपल्या. टाटांच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही उभारलेल्या संस्था आणि तुम्ही स्वीकारलेल्या मूल्यांच्या माध्यमातून तुमचा वारसा जपला जाईल," अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने टाटांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील टाटा यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. "रतन टाटा हे सोनेरी हृदय असलेले म्हणजेच अतिशय चांगल्या मनाचे होते. लोकांचे राहणीमान सुधारावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी एक व्यक्ती म्हणून तुमचे नाव कायमच स्मरणात राहिल," असे रोहित शर्माने ट्विट केले. त्याशिवाय, तुम्ही आमच्या सतत हृदयात राहाल, अशा भावना विराटने व्यक्त केल्या.

दरम्यान, आजचा दिवस महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमझ्ये शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे. टाटा यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :रतन टाटासचिन तेंडुलकररोहित शर्माविराट कोहली