नवी दिल्ली : वन डे विश्वचषकातील आजचा सामना एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे. दिल्लीमध्ये होत असलेल्या बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यावरून वाद रंगला आहे. खरं तर श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला 'टाइम आउट'चा फटका बसला अन् त्याला बाद घोषित करण्यात आले. खरं तर मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून फलंदाजीसाठी आला होता. पण चूक लक्षात आल्यानंतर त्याने हेल्मेट बदलले. पण यासाठी वेळ गेला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडूंनी त्याच्या विकेटसाठी अपील केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे. मॅथ्यूजला अनोख्या पद्धतीने बाहेरचा रस्ता धरावा लागल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. नेटकरी श्रीलंकन फलंदाजाची खिल्ली उडवताना फिरकी घेत आहेत.
'टाईम आऊट' म्हणजे काय?फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने 'टाईम आऊट'चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला. पंचांनी बाद घोषित करताच वाद चिघळला अन् मॅथ्यूज आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
दरम्यान, मॅथ्यूजला बाद घोषित करताच श्रीलंकन फलंदाजाचा पारा चढला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मॅथ्यूजने रागामध्ये हेल्मेट देखील फेकून दिले. मॅथ्यूज या निर्णयावर असहमत होता. त्याला विश्वासही बसत नव्हता. पंचांनी बाद घोषित केल्यानंतर मॅथ्यूजने बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, नियमानुसार शाकीबने अपील केली अन् पंचांनी बाद घोषित केले.