ENG vs AFG Live Match | नवी दिल्ली : अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडची डोकेदुखी वाढवली असून ११७ धावांवर निम्मा संघ तंबूत पाठवला आहे. आज वन डे विश्वचषकात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. नाणेफेक जिंकून गतविजेत्यांनी अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बलाढ्य इंग्लिश संघाला कडवी झुंज देताना अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी अप्रमित खेळी केली. अफगाणिस्तानने दिलेल्या २८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला घाम फुटल्याचे दिसते. कारण केवळ ११७ धावांवर निम्मा इंग्लिश संघ तंबूत परतला आहे. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, मोहम्मद नबी, नवीन-उल-हक आणि राशिद खान यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
इंग्लंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिन झादरान यांनी पहिल्या बळीसाठी ११४ धावांची मोठी भागीदारी नोंदवली. गुरबाज धावबाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची गाडी रूळावरून घसरली. गुरबाजने ४ षटकार आणि ८ चौकारांच्या जोरावर ५७ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी केली. १४० च्या सरासरीने धावा करून त्याने गतविजेत्यांनी डोकेदुखी वाढवली होती. गुरबाज बाद झाल्यानंतर इंग्लिश संघाने सामन्यात पुनरागमन केले. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (१४), अजमतुल्ला उमरझाई (१९) आणि राशिद खान (२३) यांनी साजेशी खेळी करून डाव पुढे नेला. इक्रम अलीखिलने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करून गतविजेत्या इंग्लंडसमोर सन्मानजनक आव्हान ठेवले. सावध खेळी करून अफगाणिस्तानचा डाव पुढे नेत असलेला इक्रम अर्धशतक करून बाद झाला. सुरूवातीला स्फोटक खेळी करणाऱ्या अफगाणिस्तानला शेवट चांगला करण्यात अपयश आले अन् अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत २८४ धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २८५ धावांची आवश्यकता आहे.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा (९) नवीन-उल-हकने त्रिफळा काढला, तर जो रूट मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर चीतपट झाला. मागील सामन्यातील शतकवीर डेव्हिड मलानला (३२) मोहम्मद नबीने बाहेरचा रस्ता दाखवला. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनला तंबूत पाठवून राशिद खानने सामन्यात रंगत आणली.
आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झादरान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - जोस बटलर (कर्णधार), डेव्हिड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टोपली.