Join us  

IND vs NZ : भारताने टॉस जिंकला! टीम इंडियात २ मोठे बदल; 'सूर्या', शमीची एन्ट्री पण 'भज्जी'ची नाराजी

india vs new zealand live match updates : आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 1:38 PM

Open in App

icc odi world cup 2023 : विश्वचषकात विजयी चौकार मारल्यानंतर विजयाचा 'पंच' मारण्यासाठी आज यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ मैदानात आहे. आज वन डे विश्वचषकात रोहितसेना मागील विश्वचषकाचे फायनलिस्ट न्यूझीलंडशी भिडत आहे. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे हा बहुचर्चित सामना खेळवला जात आहे. दोन्हीही संघ आपले चारही सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहेत. खरं तर आजचा सामना क्रमवारीत वर्चस्व गाजवणाऱ्या दोन संघांमध्ये होत आहे. आजच्या सामन्यासाठी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. खरं तर २००३ पासून भारताला कोणत्याही विश्वचषकात न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश आले नाही. भारत आणि किवी यांच्यात आठ विश्वचषक सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने फक्त तीन वेळा विजय मिळवला आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर आहे, तर शार्दुल ठाकूरच्या जागी शमीला संधी देण्यात आली आहे. नाणेफेकीवेळी रोहितने सांगितले की, प्रथम गोलंदाजी करण्याचे कोणतेही विशेष कारण नाही. मात्र, जाणकारांसह माजी खेळाडू हरभजन सिंगने रोहितच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करायला हवी होती असे मत भज्जीने मांडले. गरमीमुळे प्रथम फलंदाजी करणे सोयीस्कर असल्याचेही त्याने नमूद केले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेरभारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यादरम्यान पहिल्या डावात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने पांड्या अर्धवट षटक सोडून मैदानाबाहेर गेला. मग विराट कोहलीला निम्मे षटक टाकावे लागले. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या विश्रांती घेत आहे. त्याच्या दुखापतीवर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो २० ऑक्टोबरला संघासोबत धर्मशालाला जाणार नाही. त्यामुळे तो थेट लखनौमध्ये भारत आणि इंग्लंड या सामन्यासाठी संघासोबत उपस्थित असेल. 

विजयी 'पंच' मारण्याचे आव्हान बांगलादेशला पराभूत करून यजमान भारतीय संघाने वन डे विश्वचषकात विजयाचा चौकार लगावला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने चांगली सुरूवात केली. भारतीय गोलंदाजांना तरसवताना बांगलादेशच्या सलामीवीरांना पहिल्या बळीसाठी ९३ धावांची भागीदारी नोंदवली. सलामीवीर तंजिद हसन (५१) आणि लिटन दास (६६) यांनी अप्रतिम खेळी केली. मात्र, सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर बांगलादेशचा गड कोसळला. मग भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची कोंडी केली. बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने स्फोटक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडून विजयाकडे कूच केली. मात्र, रोहित त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि (४८) धावांवर बाद झाला. तर, गिल ५५ चेंडूत ५३ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली नाबाद (१०३) आणि लोकेश राहुलने नाबाद (३४) धावा करून भारताच्या विजयाचा चौकार मारला. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयी 'पंच' मारण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. याशिवाय न्यूझीलंडच्या संघाला देखील ही संधी आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघमोहम्मद शामीसूर्यकुमार अशोक यादव