भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना सलग आठवा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाचा दारूण पराभव करत टीम इंडियाने आपला इरादा स्पष्ट केला. १६ गुणांसह भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले तर चार संघ अद्याप शर्यतीत आहेत. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. यंदाच्या विश्वचषकाबद्दल पाकिस्तानचे माजी खेळाडू सातत्याने भाष्य करत आहेत. अशातच संघाचा माजी खेळाडू तन्वीर अहमदने एक अजब विधान केले.
टीम इंडिया निर्धारित ५० षटके खेळते पण प्रतिस्पर्धी संघाला केवळ २० षटकांतच गुंडाळते, असे कसे? असे त्याने मिश्किलपणे म्हटले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर तन्वीर अहमदने रोहितसेनेचे कौतुक केले. विराट कोहलीने ऐतिहासिक शतक झळकावून आफ्रिकेसमोर ३०० पार धावसंख्या उभारली होती, ज्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला पूर्णपणे अपयश आले.
पाकिस्तानी खेळाडूकडून भारताचे 'विराट' अभिनंदन
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याबद्दल बोलताना तन्वीर अहमदने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय टीम इंडियाचा घातक मारा सांगत आपल्या संघाचे कान टोचले. तो म्हणाला की, भारत आताच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकतर्फीच सामना होत आला आहे आणि पुढेही होईल जोपर्यंत टीम इंडियाची कामगिरी अशी राहिल तोपर्यंत. विराट कोहली वर्ल्ड क्लास खेळाडू का आहे याचा प्रत्यय आपल्याला पुन्हा एकदा आला. पण, मला एक कळत नाही की, भारत ५० षटके खेळतो पण इतरांना मात्र २०-२५ षटकांतच गुंडाळतो असे का?, असे त्याने मिश्किलपणे म्हटले. तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता.
भारताचा मोठा विजय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने आफ्रिकन गोलंदाजांना घाम फोडला. भारतीय सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी स्फोटक सुरूवात केली. पण, भारतीय सलामीवीरांना माघारी धाडण्यात आफ्रिकन गोलंदाजांना यश आले. मग त्यानंतर सुरू झाला तो 'विराट' खेळीचा शो. किंग कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करत वन डे मध्ये ४९ शतके झळकावण्याचा भीमपराक्रम केला. विराटने सावध खेळी करत शतकाला गवसणी घातली. त्याने १० चौकारांच्या मदतीने १२० चेंडूत शतक ठोकून तमाम भारतीयांना वाढदिवशी भेट दिली. भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३२७ धावांची आवश्यकता होती. पण, रवींद्र जडेजाने सर्वाधिक (५) बळी घेऊन प्रतिस्पर्धी फलंदाजांना घाम फोडला. अखेर आफ्रिकन संघ २७.२ षटकांत केवळ ८३ धावांवर सर्वबाद झाला अन् भारताने २४३ धावांनी सामना आपल्या नावावर केला.