नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांनी मोठा पराभव करून ही किमया साधली. दरम्यान, चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील या सामन्यानंतर महेंद्र सिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात काहीसे बिनसल्याचे चित्र पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन्ही खेळाडूंमध्ये कशावरून तरी वाद झाला. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंगरूममध्ये परतत असताना हा प्रकार घडला. खरं तर कॅप्टन कूल धोनी जड्डूला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत आहे, तर जडेजा ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते आहे.
या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर रवींद्र जडेजाची एक पोस्ट चर्चेत आली आहे. यामध्ये जड्डूने कर्माचा दाखला देत त्याची फळं इथेच मिळणार असल्याचे म्हटले आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या या पोस्टला त्याची पत्नी आमदार रिवाबा जडेजा हिने देखील पाठिंबा दिला आहे. "कर्म तुमच्याकडे परत येईलच... लवकर किंवा नंतर पण हे होणार हे नक्की", अशा आशयाची पोस्ट जड्डूने केली आहे. जडेजाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पत्नी रिवाबाने म्हटले, "स्वतःच्या मार्गाचा अवलंब करा."
कालच्या सामन्यात रवींद्र जडेजाची गोलंदाजी काही खास राहिली नाही. त्याने आपल्या कोट्यातील ४ षटकांत तब्बल ५० धावा दिल्या. जडेजाला केवळ एकच गडी बाद करता आला.